चिंताजनक! पाकिस्तानात १२ लाख गर्भवतींचा जीव धोक्यात; WHO चं टेन्शन वाढलं, कारण..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 10:27 AM2022-09-10T10:27:37+5:302022-09-10T10:31:12+5:30

पाकिस्तानमध्ये सध्या निसर्गाचा कहर पाहायला मिळत आहे. पुरामुळे सगळीकडे हाहाकार माजला आहे. सर्वत्र पाणी विनाशाचं कारण बनतंय. नैसर्गिक आपत्तीत १३५० लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचा एक तृतीयांश भाग पाण्याखाली गेला आहे. लाखो लोक बेघर झाले आहेत.

पाकच्या या संकटात जन्म घेतलेल्या त्या नवजात मुलांचा जीवही धोक्यात आला आहे. पाऊस, पुरामुळे बेघर होण्याच्या दु:खात काही माता आपल्या नवजात बालकांच्या चिंतेत असताना, ज्या कुटुंबातील महिला गरोदर आहेत, त्या कुटुंबातील लोकही चिंतेत आहेत.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) नं याबाबत चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. पुराच्या काळात नवजात बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तर गरोदर महिलांच्या आरोग्याबाबतही चिंता वाढत आहे.

सीएनएनच्या रिपोर्टनुसार, सिंधमधील खैरपूर नाथन शाह येथील एका महिलेने सांगितले की, १४ ऑगस्ट रोजी मुसळधार पाऊस पडत होता, त्याच दिवशी मुलगी झाली. एकीकडे आनंदाचे वातावरण होते, तर दुसरीकडे जीव वाचवण्याची चिंता होती, पुरामुळे घर उद्ध्वस्त झाले होते. आता कुठे राहायचं? असा विचार होता. त्यावेळी तात्पुरती छावणीत आसरा घेत जीव वाचवला. ही वेदना केवळ एका महिलेची नाही, तर पाकिस्तानातील हजारो माता आपल्या नवजात बालकांसाठी चिंतेत आहेत.

२६ दिवसांच्या मुलीच्या आईला हे चांगलेच ठाऊक आहे की पुराच्या पाण्यामध्ये जमिनीचा एक सुरक्षित तुकडाही मुलीसाठी नाही. रिलीफ कॅम्पमध्ये काहीही नाही. कुटुंबात ८ लोक आहेत. आम्ही पूर्णपणे असहाय्य आहोत. पुरातून जीव वाचला तरी इथेही काय घडेल, प्रत्येक क्षणी धोका आहे.

सापांची भीती असते. तब्येत बिघडली आहे, घशात इन्फेक्शन आहे, पण बळजबरी अशी आहे की औषधही विकत घेता येत नाही. अहवालानुसार, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे की, पाकिस्तानच्या विनाशकारी पुरामुळे महिला आणि लहान मुले अनपेक्षितपणे प्रभावित झाली आहेत.

पाकिस्तानमधील डब्ल्यूएचओचे प्रतिनिधी डॉ. पलिता गुणरत्न महिपाल यांनी सांगितले की, पुरामुळे देशातील आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. सुमारे १०% आरोग्य संस्था उद्ध्वस्त झाल्या आहेत. पण सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे १२ लाख गरोदर महिला ज्या सध्याच्या पुरामुळे बांधलेल्या तात्पुरत्या छावण्यांमध्ये राहत आहेत.

सध्या लाखो लोक पाकिस्तानातील मदत छावण्यांमध्ये राहत आहेत. काही पर्याय नसल्यानं मदत कर्मचाऱ्यांनी दिलेल्या रेशनवर त्यांना जगावं लागत आहे. एकच प्रतीक्षा आहे की पुराचे पाणी कसेतरी कमी झाले तर पुन्हा घर बांधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

दरम्यान, पुरामुळे मलेरियाचा धोका वाढू लागला आहे. आजूबाजूला असलेल्या घाणीमुळे डासांनी जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे ताप, फ्लूचे रुग्ण वाढत आहेत. आता साथीचे रोग पसरू नयेत अशी भीती लोकांना वाटत आहे. त्याच वेळी, डब्ल्यूएचओने म्हटले आहे की सुमारे ६.३ लाख लोक मदत शिबिरांमध्ये राहत आहेत. ही संख्या वाढू शकते.

सध्या टायफॉइड, त्वचारोग आणि श्वसनविकाराच्या रुग्णांचा आलेख वाढत आहे. परिस्थिती अनियंत्रित तर होणार नाही ना, अशी भीती वाटते. सिंध प्रांतातील परिस्थिती भयावह आहे. परिस्थिती आणखी बिघडली तर काही सांगणे कठीण आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिलीफ कॅम्पमध्ये राहणाऱ्या महिलांचे म्हणणे आहे की, आमच्याकडे मच्छरदाणीही नाही. अशा परिस्थितीत नवजात बालकांची चिंता वाढत आहे. पुरामुळे कोणताही रोग त्यांना आपल्या कवेत घेऊ शकतो. कारण डास आणि माश्या मुलांभोवती सातत्याने फिरत राहतात.