पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे होतील; माजी PM इम्रान खान यांनी व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 02:39 PM2024-05-27T14:39:24+5:302024-05-27T14:45:10+5:30

माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानबद्दल चिंता व्यक्त केली.

नेहमीप्रमाणे आता देखील पाकिस्तानातील आर्थिक आणि राजकीय स्थिती गंभीर आहे. तुरूंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तान सरकारवर टीका करताना इतिहासात घडलेल्या घटनांचा पाढा वाचून दाखवला.

इम्रान खान यांनी पाकिस्तानबद्दल चिंता व्यक्त केली. ज्या गोष्टींमुळे बांगलादेश अस्तित्वात आला त्याच गोष्टींची पुनरावृत्ती देशात होत असल्याचे खान यांनी सांगितले.

इम्रान खान यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी बंगाली नेते शेख मुजीबुर रहमान नव्हे तर लष्करी हुकूमशहा जनरल याह्या खान आणि त्यांचे निकटवर्तीय पाकिस्तानचे दोन तुकडे करण्यास जबाबदार आहेत असे म्हटले आहे.

देशाच्या विघटनासाठी शेख मुजीब यांना ज्या प्रकारे दोषी ठरवले जाते आणि त्यांना देशद्रोही म्हटले जाते, ते अत्यंत चुकीचे आहे, असे इम्रान यांनी लिहिले.

इम्रान यांनी आणखी सांगितले की, मुजीब यांचा देशाच्या संविधानावर विश्वास होता आणि त्यांना पाकिस्तानसोबत राहायचे होते. देशाचे गद्दार कोण हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक पाकिस्तानी माणसाने हमुदुर रहमान कमिशनचा अहवाल वाचायला हवा, जेणेकरून देश तोडणारा खरा गद्दार जनरल याह्या खान होता की शेख मुजीबुर रहमान हे कळेल.

इम्रान खान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक व्हिडीओ शेअर करत पाकिस्तान सरकारवर टीकास्त्र सोडले. त्यांनी हमुदुर रहमान आयोगाच्या अहवालाचा हवाला देत मुजीब हे पाकिस्तानमधील सर्वात आवडते नेते होते, त्यांना लोकशाहीनुसार अधिकार हवे होते, असे म्हटले.

आपली खुर्ची वाचवण्यासाठी याह्याने बंगालींवर अत्याचार केले आणि संविधान आणि कायदा याचे काहीच पालन केले नाही. मुजीब यांना अटक करून लष्कर न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. याह्याने बंगाली लोकांना सर्व प्रकारे लुटले. त्यांचे पैसेही लुटले गेले आणि जीवही घेतला गेला, असेही इम्रान यांनी नमूद केले.

लष्कराने बंगाली बुद्धिजीवी आणि राजकीय विरोधकांना क्रूरपणे चिरडले. बंगाली स्त्रियांवर बलात्कार झाले, आपल्या लोकांना दडपण्यात गुंतलेल्या सैन्याला शत्रूशी लढणे शक्य नव्हते. याचा परिणाम असा झाला की जनरल नियाझीने दोन आठवड्यांच्या आत शस्त्रे टाकली. पाकिस्तानी सैन्याचा भारतीय सैन्यापुढे पराभव झाला आणि नियाझीचा अपमान झाला आणि करारावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले गेले, असेही इम्रान खान यांनी म्हटले.

इम्रान पुढे म्हणाले की, जर लोकांनी मुजीब यांना निवडून दिले होते तर सत्ता त्यांच्या हाती का दिली नाही? मुजीब देशद्रोही होते की त्यांचे अधिकार हिसकावून घेणारा जनरल याह्या हा दोषी होता याचा विचार करायला हवा. १९७१ मध्ये जे काही घडले तेच आज घडत आहे. आजही आमच्या पीटीआय पक्षाला जनतेने निवडून दिले, पण आमची सत्ता आली नाही, त्यांचा नेता इम्रान खानला तुरूंगात टाकण्यात आले. ज्यांना जनतेने नाकारले ते सत्तेवर बसले आहेत.