पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 11:11 IST2026-04-09T10:55:52+5:302026-04-09T11:11:28+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी, या युद्धविराम करारात लेबनानचाही समावेश असल्याचा दावा केला होता, मात्र अमेरिका आणि इस्रायल दोघांनीही हा दावा फेटाळून लावल्याने पाकिस्तानची जागतिक स्तरावर मोठी नाचक्की झाली आहे...

अमेरिका आणि इराण यांच्यात ४० दिवस चाललेल्या युद्धानंतर, झालेल्या कथित 'सीजफायर'वरून आता आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी, या युद्धविराम करारात लेबनानचाही समावेश असल्याचा दावा केला होता, मात्र अमेरिका आणि इस्रायल दोघांनीही हा दावा फेटाळून लावल्याने पाकिस्तानची जागतिक स्तरावर मोठी नाचक्की झाली आहे.

नेमकं काय घडलं? - शहबाज शरीफ यांनी 'X' वर पोस्ट करत, इराण, अमेरिका, अमेरिकेचे सहकारी देश आणि लेबनानसह सर्व देशांनी दोन आठवड्यांसाठी हल्ले थांबवून चर्चेसाठी युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे," असे म्हटले होते. मात्र यावर आता अमेरिकेने हा दावा फेटाळून लावला

शरीफ यांच्या पोस्टवर अमेरिकेने म्हटले आहे की, "लेबनान कधीही या दो आठवड्यांच्या युद्धबंदीचा कराराचा भाग नव्हता आणि याची माहिती सर्व पक्षांना आधीच देण्यात आली होती." दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही लेबनानमधील हिजबुल्लावरील हल्ले सुरूच राहणार असल्याचे अपल्या संबोधनातून स्पष्ट केले.

इराण भडकला, शरीफ यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉटच शेअर केला - दरम्यान, युद्धविराम जाहीर झाल्यानंतरही, इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर जोरदार हल्ले सुरूच ठेवले आहेत. याच्या निषेधार्थ, इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केली, जी युद्धविराम करारानंतर खुली करण्यात आली होती.

यानंतर, इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी 'एक्स' (X) वर शहबाज शरीफ यांच्या पोस्टचा एक स्क्रीनशॉटही शेअर केला, ज्यात इराण, लेबनॉन आणि अमेरिका तसेच अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांसंदर्भात भाष्य करण्यात आले होते.

सय्यद अब्बास अराघची यांनी 'एक्स' (X) वर लिहिले, "इराण-अमेरिका युद्धविरामाच्या अटी स्पष्ट आहेत आणि अमेरिकेने हे ठरवले पाहिजे की, ते खरोखरच युद्धविरामाची अंमलबजावणी करणार की इस्रायलमार्फत युद्ध सुरूच ठेवणार. कारण या दोन्ही गोष्टी सोबत चालू शकत नाही."

एवढेच नाही तर, "संपूर्ण जग लेबनॉनमधील हिंसाचार बघत आहे. आता निर्णय अमेरिकेच्या हातात आहे. अमेरिका आपले आश्वासन कितपत पाळतो हे संपूर्ण जग पाहत आहे," असेही अब्बास यांनी म्हटले आहे.

दरम्यान, इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बाकर गालिबाफ यांनी खळबळजनक दावा केला की, चर्चेपूर्वीच १० पैकी ३ अटींचे उल्लंघन झाले आहे. यामध्ये लेबनानमधील हिंसाचार, ईरानमधील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न आणि युरेनियम संवर्धनाच्या अधिकाराला दिलेला नकार यांचा समावेश आहे.

आता या संपूर्ण प्रकरणात, अमेरिका आणि इस्रायल दोघेही लेबनानला युद्धविरामाचा भाग मानत नाहीत, तर मग, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीलल यांनी जाणूनबुजून इराणची दिशाभूल तर केली नसेल? की अमेरिकेनेच कराराचे उल्लंघन केले? असे प्रश्न उभे राहत आहेत.

















