जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 13:45 IST2025-08-13T13:34:09+5:302025-08-13T13:45:30+5:30

जर अशीच स्थिती राहिली, तर येत्या काही वर्षांत या देशाला अस्तित्वाच्या संकटाचा सामना करावा लागेल...

जगातील अनेक देशांमध्ये घटती लोकसंख्या, ही एक मोठी सस्या बनली आहे. यांत भारताचा मित्र देश असलेल्या जपानचाही समावेश आहे. येथील लोकसंख्या सलग १६ व्या वर्षी घटली आहे.

२०२४ मध्ये जपानची लोकसंख्या ९ लाख ८ हजारहून अधिक घटली आहे. अर्थात देशात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जन्माला येणाऱ्या लोकांपेक्षा फार अधिक आहे.

जर अशीच स्थिती राहिली, तर येत्या काही वर्षांत जपानला अस्तित्वाच्या संकटाचा सामना करावा लागेल. जपान निरोगी आणि दीर्घायुषी लोकांसाठी ओळखला जातो. मात्र, तरुणांच्या लोकसंख्येतील घट आणि वृद्धांच्या संख्येतील वाढ, यामुळे तेथील आरोग्य पायाभूत सुविधांवरही भार वाढत आहे.

जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी या परिस्थितीला 'मूक आणीबाणी' अथवा 'सायलेंट इमरजंन्सी' म्हटले आहे. ते म्हणाले, देशात मानवी लोकसंख्येचे संकट वाढत आहे. आम्ही कुटुंबासाठी अनुकूल धोरणांवर अधिक लक्ष केंद्रित करू, जसे की मोफत बालसंगोपन आणि कामाच्या वेळेच्या बाबतीत लवचिकपणा आणू.

जपानमध्ये सध्याही अशी अनेक धोरणे आहेत, मात्र महिला अधिक मुले जन्माला घालण्यास तयार नाहीत. एवढेच नाही तर येथे अशाही महिला मोठ्या प्रमाणावर आहेत, ज्यांनी एकही मूल जन्माला घातलेले नाही आणि जन्माला घालण्याची त्यांची इच्छाही नाही.

१२५ वर्षांत पहिल्यांदाच जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या एवढी कमी - जपानमधील जन्मदर सध्या १.२ एवढा आहे. महत्वाचे म्हणजे, २०२४ मध्ये जपानमध्ये केवळ ६,८६,०६१ मुले जन्माला आली, तर १६ लाख लोक मृत्युमुखी पडले आहेत. अशाप्रकारे जन्मलेल्यांपेक्षा १० लाख अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर, एक मूल जन्माला आला तर दोन लोकांचा मृत्यू होत आहे.

सध्या जपानची लोकसंख्या १२ कोटी एवढी आहे. जर ही संख्या अशीच कमी होत राहिली तर देशात मानवी संसाधनांचा संकट निर्माण होईल. परिणामी अर्थव्यवस्थेपासून ते सामान्य मानवी जीवनापर्यंत सर्व काही कठीण होऊन बसेल. जपानमध्ये गेल्या १२५ वर्षांच्या इतिहासात २०२४ मध्ये सर्वात कमी मुले जन्माला आली.

जपानच्या लोकसंख्येत सलग १६ व्या वर्षी एवढी मोठी घट झाली आहे. महत्वाचे म्हणजे, जपानमध्ये मोठ्या प्रमणावर परदेशी लोक स्थायिक झाले आहेत. १ जानेवारी २०२५ च्या आकडेवारीनुसार, जपानच्या एकूण लोकसंख्येच्या ३ टक्के लोक परदेशी आहेत.

गेल्या एका वर्षात, जपानची एकूण लोकसंख्या ०.४४ टक्क्यांनी कमी झाली आहे. याची भरपाई करण्यासाठी, जपानने परदेशी लोकांना आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु ही योजना देखील यशस्वी होताना दिसत नाही.

जपानच्या एकूण लोकसंख्येमध्ये ६५ वर्षांवरील वृद्धांची संख्या आता ३० टक्के झाली आहे. हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा डेटा आहे, मोनाको पहिल्या क्रमांकावर आहे.

सध्या, जपानमधील लोकसंख्येच्या केवळ ६० टक्के लोकच कामाच्या वयात म्हणजेच १५ ते ६४ वर्षांच्या दरम्यान आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे, अशाच पद्धतीने जन्मदर कमी होत राहिला, तर येथे येत्या काही वर्षांत वृद्धांची संख्या तरुणांपेक्षाही अधिक होईल.

टॅग्स :जपानJapan