Omicron News: ओमायक्रॉन संकटात कोट्यवधी लसवंतांची चिंता वाढली; WHOच्या भाकितानं झोप उडवली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 11:15 AM2021-12-13T11:15:09+5:302021-12-13T11:21:51+5:30

Omicron News: जवळपास ६० देशांत ओमायक्रॉनचा शिरकाव; भारतात आतापर्यंत ३८ रुग्णांची नोंद

देशाच्या चिंतेत ओमायक्रॉननं भर घातली आहे. आतापर्यंत देशात ओमायक्रॉनचे ३८ रुग्ण आढळले आहेत. ६ राज्यं आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. त्यातच आता जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीमुळे लस घेतलेल्या कोट्यवधी लोकांच्या चिंतेत भर पडली आहे.

ओमायक्रॉन चिंताजनक असल्याचं डब्ल्यूएचओनं सांगितलं आहे. त्यातच डब्ल्यूएचओनं दिलेल्या आणखी एका माहितीनं कोट्यवधी लोकांच्या जीवाची घालमेल सुरू झाली आहे. कोरोनाविरोधात लसीकरण हेच सर्वात प्रभावी शस्त्र समजलं जात असताना डब्ल्यूएचओनं दिलेल्या माहितीनं सगळ्यांचीच चिंता वाढवली आहे.

कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे प्रकार समोर आले. असे प्रकार अपवाद समजले जात होते. मात्र आता डब्ल्यूएचओनं सांगितलेली माहिती जगभरातील लसवंतांच्या जीवाला घोर लावणारी आहे.

ओमायक्रॉन व्हेरिएंट कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा प्रभाव कमी करण्यास सक्षम आहे आणि तो वेगानं हातपाय पसरत आहे. डेल्टा बाधितांच्या संख्येपेक्षा ओमायक्रॉन बाधितांची संख्या लवकरच वाढेल. ओमायक्रॉन जास्त संक्रामक असल्यानं तो रुग्ण संख्येच्या बाबतीत डेल्टाला मागे टाकेल, असा अंदाज डब्ल्यूएचओनं वर्तवला आहे.

डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वेगानं पसरतो. ओमायक्रॉनची लागण झाल्यानंतर लसीचा प्रभाव कमी होतो. ओमायक्रॉनच्या बाबतीत लक्षणं कमी दिसतात, अशी माहिती समोर आल्यानं वैद्यकीय विश्वाची काळजी वाढली आहे.

ओमायक्रॉन लवकरच डेल्टामुळे बाधित झालेल्या रुग्णांपेक्षा अधिकांना संक्रमित करेल, असा भीतीदायक अंदाज संयुक्त राष्ट्राच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. कम्युनिटी ट्रान्समिशन झालेल्या भागात ओमायक्रॉन धोकादायक ठरेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

डेल्टा व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात सापडला होता. देशात आलेल्या दुसऱ्या लाटेला डेल्टाच कारणीभूत होता. दुसऱ्या लाटेनं टोक गाठलं असताना देशात दररोज ४ लाख रुग्ण आढळून आले होते. ओमायक्रॉन व्हेरिएंट डेल्टापेक्षा अधिक संक्रामक आहे. त्यातच तो लसीचा प्रभाव कमी करत असल्यानं चिंता वाढली आहे.

ओमायक्रॉन व्हेरिएंट सर्वप्रथम आफ्रिकेत आढळून आला. त्यानंतर तो जगभरात पसरला. अनेक देशांनी आफ्रिका खंडातील देशांमधून सुरू असलेला हवाई वाहतूक रोखली. निर्बंध लादले. मात्र तरीही ओमायक्रॉननं वेगानं हातपाय पसरले.

ओमायक्रॉन कोरोना लसीचा प्रभाव कमी करत असल्यानं बूस्टर डोसची गरज निर्माण झाली आहे. ऍस्ट्राझेनेका आणि फायझरचे बूस्टर डोस ओमायक्रॉन विरोधात प्रभावी आहेत. मात्र भारत सरकारनं अद्याप बूस्टर डोसबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे लसवंतांची चिंता वाढली आहे.

Read in English