रशिया-उत्तर कोरियातील 'या' करारामुळे जगात भडकणार तिसरं महायुद्ध?; अमेरिका चिंतेत By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 02:39 PM 2024-06-20T14:39:29+5:30 2024-06-20T14:44:46+5:30
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे २४ वर्षात पहिल्यांदाच उत्तर कोरिया येथे गेले आहेत. उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग ऊन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या या ऐतिहासिक भेटीत अनेक करार करण्यात आले आहेत. त्यामुळे बलाढ्य अमेरिकाही टेन्शनमध्ये आली आहे.
करारानुसार, जर उत्तर कोरिया आणि रशिया यांच्यावर कुठल्याही देशाने हल्ला केला तर दोन्ही देश मिळून त्याला सडेतोड उत्तर देतील. या दोन्ही देशातील हा करार इतका महत्त्वाचा आहे त्याचा अंदाज २४ वर्षांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर आलेत त्यावरून दिसून येते.
याआधी २००० साली व्लादीमीर पुतिन हे उत्तर कोरियात गेले होते. मात्र यंदा किम जोंग उननं पुतिन यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेट टाकलं आहे. पुतिनसोबत भेटीनंतर किम यांनी पत्रकार परिषदही बोलावली. आजपर्यंत किम यांनी कधीही पत्रकार परिषद घेतली नाही. रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील करारामुळे तिसरं महायुद्धही भडकू शकते अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करतायेत.
किम आणि पुतिन यांच्या कराराला समजून घ्यायचं असेल तर ८५ वर्षापूर्वी इतिहासात काय घडलं हे आठवावं लागेल. २७ सप्टेंबर १९४० मध्ये जर्मनी, जपान, इटली यांनी त्रिपक्षीय करार केला होता. जर्मनचा हुकुमशाह एडोल्फ हिटलरच्या नेतृत्वात झालेल्या या करारानं दुसऱ्या महायुद्धात तेल ओतण्याचं काम केले.
जगातील असा एकही देश वाचला नाही जो दुसऱ्या महायुद्धात सहभागी झाला नाही. युद्धात भाग घेणं ही प्रत्येकाची मजबुरी बनली होती कारण जर्मनी, जपान, इटलीत झालेला हा करार काही असाच होता. या दुसऱ्या महायुद्धात ८.५ कोटी जनतेला जीव गमवावा लागला होता.
२५ ऑक्टोबर १९३६ रोजी जर्मनी आणि इटलीनं रोम बर्लिन एक्सिस नावाचा करार केला होता. त्यानंतर महिनाभरात जपान त्यात सहभागी झाला, या तिघांना एक्सिस पॉवर्स म्हटलं गेले. जर्मनी, जपान, इटलीत झालेल्या या कराराला एंटी कोमिंटर्न पॅक्टही म्हटलं जाते.
सोव्हिएत युनियन म्हणजेच तत्कालीन रशियाविरुद्ध साम्यवादी विरोधी करार होता. मात्र, जेव्हा जर्मनी आणि सोव्हिएत युनियनने एकमेकांशी अनाक्रमण करारावर स्वाक्षरी केली तेव्हा हा करार तुटला. २३ ऑगस्ट १९३९ रोजी हा करार करून दोन्ही देशांनी एकमेकांच्या हद्दीत प्रवेश न करण्याची शपथ घेतली. या करारानेच जर्मनीला पोलंडवर हल्ला करण्यास चिथावणी दिली, ज्याने दुसरे महायुद्ध सुरू केले
जर्मनी, जपान आणि इटली यांच्यातील त्रिपक्षीय करारामध्ये हे तिन्ही देश एकमेकांना राजकीय, आर्थिक आणि लष्करी दृष्ट्या सहकार्य करतील यावर भर देण्यात आला होता. कोणत्याही देशाने करारातील तीनपैकी कोणत्याही एका देशावर हल्ला केला तर इतर देश तो स्वतःवरील हल्ला मानतील आणि त्याला जोरदार प्रत्युत्तर देतील असा हा करार होता.
दुसऱ्या महायुद्धात त्रिपक्षीय करार महत्त्वाचा होता कारण बहुतेक देश युद्धात सामील झाले होते. ७ डिसेंबर १९४१ रोजी जपानने हवाईच्या ओआहू बेटावरील अमेरिकन नौदल तळ असलेल्या पर्ल हार्बरवर हल्ला केला. दुसऱ्याच दिवशी म्हणजे ८ डिसेंबरला अमेरिकेने जपानविरुद्ध युद्ध घोषित केले. त्रिपक्षीय करारानुसार हे युद्ध केवळ जपानविरुद्ध नव्हते तर ते जर्मनी आणि इटलीविरुद्धही होते.
आता अमेरिकेचे उत्तर कोरिया आणि रशियाशीही फारसे चांगले संबंध नाहीत. अमेरिकेचा मित्र राष्ट्र दक्षिण कोरिया उत्तर कोरियाशी बलून युद्ध करत आहे. अशा जटील समीकरणात कोणत्याही देशात युद्ध सुरू झाले, तर तिसरे महायुद्ध भडकू शकते. रशिया उत्तर कोरियाला आपले लष्करी तंत्रज्ञान देऊ शकेल असं रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील या कराराबाबत अमेरिकेला सर्वात जास्त भीती वाटते.