Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 15:45 IST2025-10-10T15:40:59+5:302025-10-10T15:45:54+5:30

Nobel Peace Prize 2025 Maria Corina Machado: शांततेचं नोबेल मिळावे म्हणून ज्यांनी आटापिटा केला, त्या अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पदरी निराशा पडली. मारिया कोरिना मचाडो यांना यंदाचे शांततेचं नोबेल मिळालं.

युद्ध थांबवल्याचे दावे करत शांततेच्या नोबेलसाठी आदळआपट करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची निराशाच झाली. व्हेनेझुएलातील विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो या ट्रम्प यांना भारी ठरल्या. त्यांना २०२५ चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

१० ऑक्टोबर रोजी नोबेल शांती पुरस्कार जाहीर झाला. व्हेनेझुएलातील आयरन लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारिया कोरिना मचाडो यांना यंदा शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

मारिया कोरिना मचाडो या व्हेनेझुएलामध्ये विरोधी पक्षनेता आहेत. त्या लोकशाही आणि मानवाधिकार प्रस्थापित होण्यासाठी संघर्ष करत आहेत.

मारिया कोरिना मचाडो यांचा जन्म १९६७ मध्ये झाला होता. त्या इंजिनिअर आहेत. पण, पुढे त्या राजकारणात आल्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून सक्रीय राजकारण करत आहेत. २०११ ते २०१४ या काळात त्यांनी व्हेनेझुएलाच्या राष्ट्रीय सभेच्या सदस्या म्हणून काम केले आहे.

सध्या व्हेनेझुएलामध्ये असलेल्या सरकारविरोधात उभ्या राहिलेल्या लोकशाही आंदोलनाचे त्या नेतृत्व करत आहेत. व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपती यांच्यासोबत अमेरिकेचे संबंध ताणले गेलेले आहेत. ट्रम्प हे नोबेल मिळेल याबद्दल आशावादी होते, पण त्यांना हुलकावणी मिळाली.

नॉर्वेची राजधानी ओस्लोमध्ये नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा करण्यात आली. मारिया कोरिना मचाडो यांना त्यांच्या लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नांसाठी हा पुरस्कार दिला जात असून, ७ कोटी रुपये आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मारिया यांच्या नावाची घोषणा करताना नोबेल समितीने म्हटले की, "जगातील अनेक भागांमध्ये हुकुमशाही वाढत असताना आणि लोकशाही कमकुवत होत असताना मारिया कोरिना मचाडो यांच्यासारख्या व्यक्तीचे धाडस नवीन आशादायक आहे. लोकशाही ही चिरंतन शांततेची पूर्वअट आहे. ज्यावेळी सत्ता हिंसा आणि भीतीद्वारे जनतेला दडपते तेव्हा अशा धाडसी व्यक्तींचा सन्मान करणे आवश्यक ठरते."