जगाचा दुश्मन बनविले! बेलगाम शी जिनपिंग यांच्यावर गंभीर आरोप; पक्षांतर्गत विरोध वाढता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 11:05 AM2020-08-19T11:05:57+5:302020-08-19T11:11:20+5:30

कम्युनिस्ट पार्टीवर जिनपिंग यांचे प्रभावी नियंत्रण राहिल्याचे सध्याच्या घडामोडींवरून दिसून येत नाही. यावेळी केवळ चीनचीच अर्थव्यवस्था खराब झालेली नसून राष्ट्राध्यक्षांच्या हातातूनही हळूहळू परिस्थिती निसटत चालली आहे.

चीनचे राष्ट्राध्य़क्ष शी जिनपिंग यांना त्यांच्याच देशात अन त्यांच्याच पक्षातून विरोधाचा सामना करावा लागत आहे. सेंट्रल पार्टी स्कूलमधून निलंबित केली गेलेली प्रोफेसर काई शिया हिने सांगितले की, राष्ट्राध्यक्षांच्या हाती बेलगाम सत्ता दिल्याने चीन जगाचा शत्रू बनला आहे.

सेंट्रल पार्टी स्कूलमध्ये चीनचे धनाढ्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिले जाते. यामध्ये काम करणाऱ्या प्रोफेसर काई शिया यांनी जिनपिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जिनपिंग यांची नीती देशाला संपवत चालली आहे. राष्ट्राध्य़क्षच सेंट्रल पार्टी स्कूलचे अध्यक्ष असतात. यामुळे शिया यांनी केलेली टीका महत्वाची आहे.

शिया यांना सोमवारी कम्युनिस्ट पार्टीने निलंबित केले आहे. यामागे एक कथित ऑडिओ रेकॉर्डिंग आहे, जी काई शिया यांचीच असल्याचे मानले जात आहे. या मध्ये शिया यांनी जिनपिंग यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.

काई यांनी सुरक्षेच्या कारणावरून चीन सोडले आहे. सेंट्रल पार्टी स्कूलने सांगितले की, काई यांच्या टीकेमुळे देशाच्या सार्वभौमतेला धक्का पोहोचला आहे. यामुळे गंभीर राजकीय समस्या तयार झाल्या आहेत.

द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीमध्ये काई यांनी सांगितले की, देशातून बाहेर पडल्यानंतर आनंदी आहे. शी यांच्या कार्यकाळात चिनी कम्युनिस्ट पार्टी आता चीनच्या प्रगतीसाठी ताकदवान राहिलेली नाही. खरे तर हे लोकच चीनच्या विकासाला बाधा बनू लागले आहेत.

मी एकटीच नाहीय जी पक्ष सोडू इच्छित होते. असे अनेक लोक आहेत ज्यांना पार्टी सोडायची आहे. माझ्या बोलण्याला जागा उरली नव्हती तेव्हाच मी काही वर्षांपूर्वी पार्टी सोडायचा निर्णय घेतला होता, असे काई यांनी सांगितले.

काई या पब्लिक पॉलिसी एक्सपर्ट होत्या. त्यांनी सांगितले की, शी यांनी आपली नीती राबवून चीनला संपूर्ण जगाचा शत्रू बनविले आहे. चीनमध्ये त्यांच्याविरोधात एक शब्दही खपवून घेतला जात नाही. अनेक जण नाराज आहेत. मात्र, त्यांना बदल्याची कारवाई, भ्रष्टाचाराचे खोटे आरोप लावण्याची भीती वाटत असल्याने ते आवाज उठवत नाहीत.

काई यांनी जिनपिंग यांच्यावर आणखी एक गंभीर आरोप लावला आहे. कोरोना व्हायरसबाबत जिनपिंग यांना 7 जानेवारीलाच माहिती मिळाली होती. मात्र, त्यांनी याची घोषणा 20 जानेवारीला केली. एवढा वेळ त्यांनी का लावला, असा सवालही केला आहे.

शी जिनपिंग एकटेच निर्णय घेत असल्याने चुकाही रोजच्याच होऊन गेल्या असल्याचे त्या म्हणाल्या.

कम्युनिस्ट पार्टीवर जिनपिंग यांचे प्रभावी नियंत्रण राहिल्याचे सध्याच्या घडामोडींवरून दिसून येत नाही. यावेळी केवळ चीनचीच अर्थव्यवस्था खराब झालेली नसून राष्ट्राध्यक्षांच्या हातातूनही हळूहळू परिस्थिती निसटत चालली आहे. जिनपिंग यांच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले असून त्यामध्ये भारतीय जवानांनी मारलेल्या चिनी सैन्याचा आकडा जाहीर न करणे हे देखिल कारण बनले आहे.

समुद्रामध्ये चीनची मनमानी आता भारी पडू लागली आहे. हाँगकाँगमध्ये लावण्यात आलेले प्रतिबंधही जिनपिंग यांच्या टीकेचे कारण बनले आहेत. यामुळे चीनमध्ये राष्ट्रवादाचा उन्माद एका काही काळासाठी फायद्याचा ठरू शकतो. परंतू जिनपिंग यांना सत्ताधारी बनून राहणे मोठे आव्हान ठरणार असल्याचे जाणकारांनी सांगितले.