जो बायडेन यांनी बायकोला 5 वेळा केलं होतं प्रपोज!; असे आहेत त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यातील गंमतीदार किस्से

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 02:38 AM2021-01-21T02:38:15+5:302021-01-21T07:44:04+5:30

जो बायडेन यांनी अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. जगातील सर्वांत जुन्या लोकशाही देशाचे ते सर्वाधिक वय असलेले अध्यक्ष बनले आहेत. वयाच्या ७८व्या वर्षी ते तिसऱ्या प्रयत्नात अमेरिकेचे अध्यक्ष बनले. बायडेन यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील अनेक मनोरंजक गोष्टी आता पुढे येत आहेत.

नीट बोलताही येत नसे - १० वर्षांचे असताना त्यांना आजारामुळे नीट उच्चार करता येत नसत. आपले आडनावही नीट सांगता येत नसे. आसपासचे लोक ‘बाय-बाय’ म्हणून त्यांची टिंगल करीत.

उत्तम फूटबॉलपटू - शालेय जीवनात ते फूटबॉलचे उत्तम खेळाडू होते. एकदा ते म्हणाले, खरेतर फूटबॉल या खेळाने मला संकटांचा सामना करण्यास शिकविले.

दारू-सिगारेट नाही - ते नेहमी गमतीने लोकांना सांगतात, लक्षात ठेवा माझे नाव जो बायडेन आहे. मला आइसक्रीम खूप आवडते, मी दारू आणि सिगारेट पीत नाही.

पत्नीसाठी ‘सिनेटर’ - त्यांचे कुत्र्यांवर विशेष प्रेम आहे. १९६७ साली त्यांनी पत्नीसाठी कुत्रा खरेदी केला होता. त्याचे नाव ठेवले होते सिनेटर.

आता बायडेन यांच्याकडे दोन जर्मन शेफर्ड जातीची कुत्री आहेत.

...पण आजार आडवा आला - बायडन यांनी सायराकस विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्या वेळी अमेरिका आणि व्हिएतनाम युद्ध सुरू होते. बायडेन यांनाही लढाईसाठी पाठविले जाणार होते; परंतु अस्थमाचा आजार आडवा आल्याने त्यांना जाते आले नाही.

दोन वेळा पराभव १९८७ आणि २००८ मध्ये बायडेन यांनी डेमोक्रॅटिक पक्षातून अध्यक्षपदाची उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले; परंतु दोन्ही वेळेला त्यांचा पराभव झाला.

बराक ओबामा यांनी केले होते कौतुक अध्यक्षपदाच्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवसात बराक ओबामा यांनी बायडेन यांचा प्रेसिडेंट मेडल ऑफ फ्रीडम हा सन्मान देऊन गौरव केला होता. त्यावेळी ओबामा म्हणाले होते, बायडेन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात उत्तम उपाध्यक्ष आणि वाघ आहेत. त्यांचा समजूतदारपणा आणि क्षमता यावर माझा पूर्ण विश्वास होता. हे एकून बायडेन यांना अश्रू अनावर झाले होते. त्यावर बायडेन म्हणाले, मी कायमचा तुम्ही ऋणी बनलो आहे. आपण मला क्षमतेपेक्षा अधिक सन्मान दिला. अत्यंत कठीण काळात आपण मला खचू दिले नाहीत.

दुसरे लग्न १९७७ मध्ये त्यांनी जिल यांच्याशी दुसरे लग्न केले. त्या पेशाने प्रोफेसर आहेत. आजही त्या शिकविण्याचे काम करतात. त्या सांगतात, बायडेन यांनी त्यांना पाच वेळा प्रपोज केले होते.

Read in English