२ मुली, ६ बहिणी, ६ भाऊ... १४ जणांच्या मृत्यूनंतरही शिल्लक आहे मसूद अझहरचे कुटुंब
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 18:47 IST2025-05-08T18:33:53+5:302025-05-08T18:47:48+5:30
मसूद अझहर हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. या संघटनेने भारतात अनेक मोठे हल्ले केले आहेत, ज्यात शेकडो निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आता भारताने याचा बदला घेतला आहे.

पाकिस्तानातील बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्य तळ मरकज सुभानल्लाहवर भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यात मसूद अझहरच्या संपूर्ण कुटुंबातील १० सदस्य ठार झाले आहेत. या हल्ल्यात मसूद अझहरच्या जवळच्या चार लोकांचाही मृत्यू झाला.
या हल्ल्यात मसूदची मोठी बहीण, मेहुणे आणि चार जवळचे लोक मारले गेल्याचे वृत्त आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मौलाना काशिफ, त्यांचे कुटुंब, मौलाना अब्दुल रौफ यांची मोठी मुलगी, नातू आणि चार मुले यांचा समावेश होता. या हल्ल्यात त्याच्या कुटुंबाचा नाश झाल्यानंतर मसूद अझहर खूप अस्वस्थ आहे. मरकझ सुभानल्लाह कॉम्प्लेक्स हे जैशचे मुख्य प्रशिक्षण आणि ऑपरेशनल मुख्यालय मानले जाते, जिथे पुलवामासारखे हल्ले रचण्यात आले आहेत. हा हल्ला झाला त्यावेळी मसूद अझरचे कुटुंबिय तिथेच होते.
मसूद अझहरचा जन्म बहावलपूरमध्ये झाला आणि त्याचे वडील अली बख्श साबीर पोल्ट्री फार्म चालवत होते. मसूद अझहरचे सात काका होते. कलीमुल्लाह, नजीब उल्लाह, रहमत उल्लाह, सैफ उल्लाह, सामी उल्लाह आणि इकबाल उल्लाह, ज्यापैकी तीन सौदी अरेबिया (केएसए) मध्ये स्थायिक आहेत. त्याच्या आईच्या बाजूने, मोहम्मद सज्जाद, मोहम्मद शाहिद आणि मोहम्मद वाजद चुगताई हे त्याचे मामा होते.
मसूद अझहरला सहा भाऊ होते, त्यापैकी बहुतेक कोणत्या ना कोणत्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होते. मोठा भाऊ मोहम्मद ताहिर अन्वर हा अफगाणिस्तानातील जैश-ए-मोहम्मदचा लष्करी व्यवहार प्रमुख होता. दुसरा भाऊ, मोहम्मद इब्राहिम अझहर, अफगाण कारवायांवर देखरेख करत असे. त्याचे आणखी दोन भाऊ उस्मान आणि उमर जम्मू आणि काश्मीरमध्ये मारले गेले.
अफगाण वंशाचा मुलगा हुजैफा याला मसूद अझहरच्या कुटुंबाने दत्तक घेतले होते, जो नंतर अफगाणीस्तानतल्या कारवायांमध्ये सक्रिय झाला. अब्दुल रौफ नावाचा एक भाऊ जैशचा डेप्युटी कमांडर आहे. त्याला हसन नावाचा एक मुलगा आणि दोन मुलीही होत्या. मसूद अझहरचा धाकटा भाऊ मोहम्मद अमर हा भरती आणि प्रचार कार्यात सहभागी होता.
मौलाना मसूद अझहरच्या पत्नीचे नाव शाजिया आहे. तिला वलीउल्लाह आणि अब्दुल्ला असे दोन मुलगे आहेत आणि दोन मुली आहेत. मसूद अझहरची पत्नी शाजियाचे दोन भाऊही सौदी अरेबियात आहेत. मसूदला ६ बहिणी आहेत ज्या बहावलपूरमधील धार्मिक आणि संघटनात्मकदृष्ट्या सक्रिय असलेल्यांशी विवाहित आहेत. जहरा बीबीचा विवाह हाफिज जमीलशी झाला होता जो सुभान अल्लाह कॉम्प्लेक्सशी संबंधित होता.
अब्दा बीबीचा पती मोहम्मद तैय्यब होता, तर राबिया बीबीचे लग्न अब्दुल रशीदशी झाले होते जो मरकझ उस्मान-ओ-अलीशी संबंधित होता. इतर बहिणी सादिया बीबी, सफाया आणि समरिया बीबी आहेत. त्यांच्याशिवाय, युसूफ अझहर, अनस, मोहम्मद अमर, बासित आणि बासीम हे जावई आणि पुतणे देखील कारवायांमध्ये सक्रिय होते. त्यापैकी बरेच जण जैशमध्ये वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदांवर काम करत होते.