Israel-Gaza violence: सैन्याची गाझा पट्टीत घुसण्याची तयारी; इस्त्रायलविरोधात 57 मुस्लिम देश एकत्र येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 08:55 AM2021-05-15T08:55:01+5:302021-05-15T09:02:26+5:30

Israeli airstrikes on Hamas: इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. .गाझा पट्टीच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील इस्त्रायली सीमेवरून सुमारे 40 मिनिटे तोफगोळ्यांचा पाऊस पाडण्यात आला.

Gaza attack: इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरु झालेले हल्ले आता मोठे रुप घेऊ लागले असून इस्त्रायलविरोधात (Israel attack)तब्बल 57 मुस्लिम देश एकत्र येणार आहेत. मुस्लिम देशांची संघटना 'ऑर्गनायजेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन' (OIC) ने उद्या, 16 मे रोजी या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. (Organization of Islamic Cooperation (OIC) will called meeting of 57 Muslim contries against israile on Sunday 16 May 2021)

ओआयसीने याबाबतचे ट्विट केले आहे. सौदी अरेबियाच्या मागणीनुसार संघटनेच्या कार्यकारी समितीच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या स्तरावरील बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत येरुसलेममध्ये अल अक्सा मशिदीमध्ये झालेली हिंसा आणि पॅलेस्टाईन भागात इस्त्रायलची आक्रमकता यावर चर्चा केली जाणार आहे. (Israel fired artillery and mounted more air strikes on Friday against Palestinian militants in the Gaza Strip amid constant rocket fire deep into Israel's commercial centre.)

57 सदस्यांच्या या संघटनेने इस्त्रायलच्या कारवाईचा निषेध व्य़क्त केला होता. यानंतर या संघटनेचा प्रमुख देश सौदी अरेबियाने वेगळे वक्तव्य जारी केले होते. इस्त्रायलने निष्पाप पॅलेस्टीनींचे जीव घेणे तात्काळ बंद करावे असे म्हटले होते.

इस्त्रायलविरोधात मुस्लिम देशांना एकत्र करण्यामागे तुर्कस्तान आणि पाकिस्तानने मोठी ताकद लावली आहे. मुस्लिम देशांना गाझा पट्टीतील हमासच्या मोहिमेला एकजुट होऊन पाठिंबा द्यायला हवा असे तुर्कीने म्हटले आहे. इस्त्रायलविरोधात आता स्पष्ट भूमिका घेण्याची वेळ आली आहे असे म्हटले आहे.

तुर्कीचे उपराष्ट्रपती फुआत ओकते यांनी गुरुवारी जगभरातील मुस्लिम देशांना एकजूट होण्याचे आवाहन केले आहे. हे सारे देश फक्त बोलत आहेत, कोणीही कठोर पाऊल ऊचलत नाहीय.

येरुशलेममध्ये 10 मे पासून हे हल्ले सुरु झाले आहेत. यामध्ये 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्त्रायलवर हमासकडून (Hamas) जोरदार रॉकेट हल्ले सुरु आहेत. यामुळे इस्त्रायलने हमासचे कंबरडे मोडण्यासाठी गाझा पट्टीमध्ये सैन्य आणि रणगाडे पाठविले आहेत. जमिनीवरील मोठ्या युद्धाची तयारी इस्त्रायल करू लागला आहे.

एकीकडे इस्त्रायलविरोधात मुस्लिम राष्ट्रांच्या शक्ती एकवटत असताना इस्त्रायल सैन्याने कारवाई सुरु केली आहे. पॅलेस्टाईनवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 119 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 31 मुले आणि 19 महिला आहेत. तर 830 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इस्त्रायलमध्ये मृतांची संख्या आठवर गेली आहे. (Israel steps up attacks on Gaza, using ground forces for first time)

गाझा पट्टीच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील इस्त्रायली सीमेवरून सुमारे 40 मिनिटे तोफगोळ्यांचा पाऊस पाडण्यात आला. यामुळे सीमेवर राहणाऱ्या पॅलेस्टाईन नागरिकांनी तेथून पलायन सुरु केले आहे.

संयुक्त राष्ट्रांनुसार जवळपास 200 हून अधिक इमारती नेस्तानभूत झाल्या आहेत. शेकडो लोकांनी उत्तरेकडील गाझा पट्टीतील शाळांमध्ये शरण घेतली आहे. इस्त्रायलच्या यहूदी आणि अरब मिश्रित भागात निमलष्करी दले तैनात करण्यात आली आहेत. तिथे दंगल सुरु झाली आहे.

इस्त्रायल सेन्याचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल जोनाथन कोनरिकस यांनी सांगितले की, आम्ही 160 लढाऊ विमाने, पायदळ तयार ठेवले आहे. रणगाड्यांनी काही विशेष लक्ष्य ठेवून मारा केला आहे, परंतू आम्ही अद्याप गाझा पट्टीमध्ये घुसलेले नाही आहोत.

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मोहिम सुरु होण्यास काही वेळ लागणार आहे. यावेळी हमासला चांगलाच धडा शिकविला जाणार आहे.