काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 10:31 IST2025-09-23T10:25:57+5:302025-09-23T10:31:02+5:30
Afghan boy plane's landing gear: एका १३ वर्षाच्या मुलाने विमानाच्या लँडिंग गिअरजवळ असलेल्या जागेत प्रवास करून दिल्ली गाठली. त्या घटनेने सगळ्यांना अवाक् केलं आहे.

शिद्दत नावाचा सिनेमा बघितला असेल, तर तुम्हाला लँडिंग गिअरजवळ बसून प्रवास कसा करतात याची कल्पना आलेली असेल. अनेकदा लोक या धोकादायक जागेत बसून प्रवास करतात. पण, यात बहुतांश लोकांचा मृत्यू होतो. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे एका १३ वर्षाच्या मुलाने याच लँडिंग गिअरजवळ बसून काबूल ते दिल्ली प्रवास केला. तोही सुखरुप!
अफगाणिस्तानातील काबूलवरून दिल्लीला येणार्या विमानाच्या लँडिंग गिअरच्या जागेत बसून १३ वर्षीय मुलाने प्रवास केला. दोन तासांच्या प्रवासानंतरही तो व्यवस्थित होता. विमानाजवळ फिरत असताना त्याची चौकशी केली, तेव्हा ही घटना उघडकीस आली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
हा मुलगा अफगाणिस्तानातील कुंदुज शहरातील आहे. विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच तो लपून लँडिंग गिअरच्या जाग बसला होता. त्यामुळे विमानाचा लँडिंग गिअर कुठे असतो आणि त्याच जागेत बसून लोक कसा प्रवास करतात, हे समजून घेणे औत्सुक्याचाच विषय आहे.
ज्या ठिकाणी बसून या मुलाने प्रवास केला, ती लँडिंग गिअरची जागा विमानाच्या मध्यभागी असते. ही तिच जागा असते, जिथे उड्डाण केल्यानंतर आणि उतरवण्यापूर्वी विमानाचे टायर वर खेचले जातात आणि ती जागा बंद होते.
ही जागा इतकी छोटी असते की, तिथे फक्त विमानाचे टायरचं व्यवस्थित बसू शकतात. एखाद्या माणसाला बसण्यासाठी खूपच कमी जागा असते. पण, तरीही काही लोक इथे बसून प्रवास करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना जीवही गमवावा लागतो.
विमानाने उड्डाण केल्यानंतर टायर वर खेचण्यासाठी हायड्रोलिक सिस्टिम काम करते. ती खूपच शक्तिशाली असते. त्याच्या आजूबाजूला जर माणूस असेल, त्याचा अति दाबामुळे मृत्यू होऊ शकतो.
या जागेवर बसून प्रवास करणाऱ्या बहुतांश लोकांचा मृत्यू होण्याचे कारण म्हणजे लँडिंग गिअर बंद झाल्यानंतर तिथे ऑक्सिजनचा पुरवठा होणं कमी होत जातो. त्यामुळेही हा प्रवास जीव धोक्यात घालून करण्याचा मानला जातो.