डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा पहिला पुरावा जगासमोर आला; इराण युद्धात रशियाचा फायदाच फायदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:34 IST2026-03-13T12:29:43+5:302026-03-13T12:34:59+5:30

अमेरिका इस्रायलविरुद्ध इराण युद्धाला आज १४ दिवस होतील. अमेरिका युद्धाच्या पहिल्या दिवसापासून स्वत:च्या विजयाचे अनेक दावे करत आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणकडे शरण जाण्याशिवाय पर्याय नाही असा दावाही अमेरिकेने केला होता.

अमेरिकेने भलेही युद्धामुळे इराण कमकुवत झाला आहे असे कित्येक दावे करू दे परंतु अमेरिका त्यांच्यात डावात अडकल्याचे दिसून येत आहे. याचमुळे युद्धाच्या १४ दिवसानंतर अमेरिकेच्या पराभवाचा एक मोठा पुरावा पहिल्यांदाच जगासमोर आला आहे.

इराणसोबत युद्धात अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा पुरावा आज संपूर्ण जगाने पाहिला आहे. ज्या ट्रम्प यांनी कालपर्यंत जगाला रशियन तेल खरेदी केल्याबद्दल गंभीर परिणामांची धमकी दिली होती तेच ट्रम्प आता रशियन तेल खरेदीला मान्यता देत आहे.

इराण युद्धामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना रशियावरील निर्बंध उठवण्यास भाग पाडले आहे. आम्ही इराणचा पराभव केला असं जरी ते जगाला सांगत असले तरी या युद्धामुळे केवळ अमेरिकेचेच नुकसान झाले नाही तर जागतिक तेल संकटही निर्माण झाले आहे. चार वर्षांत प्रथमच कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलर्सच्या पुढे गेल्या आहेत.

अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलर्सच्या पुढे गेल्या आहेत. जर ही परिस्थिती नियंत्रणात आणली नाही तर संपूर्ण जगासाठी मोठे संकट निर्माण होऊ शकते. ट्रम्प यांच्याकडे युद्ध संपवण्याबाबत कोणतीही उत्तर नसतील, परंतु त्यांनी शांतपणे समुद्रात अडकलेले रशियन तेल खरेदी करण्यासाठी तात्पुरती मान्यता दिली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ही मंजुरी मजबुरीने दिली आहे असं अनेकांना वाटते. कारण त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. ही खरेदी केवळ अडकलेल्या जहाजांमधून तेल खरेदी करण्यासाठी आहे असंही अमेरिकेने स्पष्ट केले.

हा एक तात्पुरता निर्णय आहे आणि त्यामुळे रशियाला कोणताही महत्त्वपूर्ण आर्थिक फायदा होणार नाही असं अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने म्हटले आहे. मात्र जग ट्रम्प यांच्या निर्णयाकडे वेगळ्या दृष्टीने पाहत आहे.

ट्रम्प यांनी इराण युद्धापासून पुतिन यांना दूर ठेवण्यासाठी लाच दिली का? - इराण युद्धात जगभरातील अनेक देश अमेरिकेला पाठिंबा देत आहेत तर व्लादिमीर पुतिन यांनी युद्ध संपवण्याचे आवाहन केले आहे. सोबतच पुतिन यांनी इराणी नेत्यांशी चर्चा केली आहे.

अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. याचा अर्थ पुतिन यांना कोणत्याही परिस्थितीत युद्धापासून दूर ठेवण्याची ट्रम्प यांची इच्छा आहे. कारण जर रशियाने या युद्धात प्रवेश केला तर अमेरिकेसह अनेक देशांना अडचणी येऊ शकतात. म्हणूनच ट्रम्प यांनी पुतिन यांना फायदा पोहचेल असा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेने युक्रेनच्या बदल्यात इराणची देवाणघेवाण करण्यासाठी रशियाशी करार केला आहे. या चौकटीत सर्व काही घडत आहे. अशा परिस्थितीत येत्या काळात जगाला काय पाहावे लागणार आहे हे बाकी आहे. जगाला आश्चर्यचकित करणारा कोणता निर्णय ट्रम्प घेतील अशीही चर्चा आहे.

















