भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 09:55 IST2025-05-20T09:46:24+5:302025-05-20T09:55:59+5:30
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला उघड पाठिंबा दर्शवला, तेव्हापासून 'बॉयकॉट तुर्की' हा ट्रेंड सुरू झाला. आता भारताने तुर्कीच्या अनेक उत्पादनांवर बहिष्कार टाकला आहे.

भारतासोबतच्या लष्करी संघर्षात पाकिस्तानला तुर्कीकडून उघड पाठिंबा मिळाला. त्यानंतर भारतीय व्यापारी, ग्राहक आणि कंपन्यांनी अनेक तुर्की उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे, विमानतळावर विमान वाहतूक सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीचा करार रद्द करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, चॉकलेट, फळे, सुकामेवा आणि इतर वस्तूंच्या आयातीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या भारताच्या या बहिष्कारामुळे तुर्कीला दररोज अनेक हजार कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.
भारतातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांनीही तुर्कीशी संबंध तोडले आहेत. सध्याच्या परिस्थितीमुळे आयआयटी बॉम्बे, जेएनयू आणि जामिया मिलिया इस्लामिया यासारख्या विद्यापीठांनी तसेच खाजगी विद्यापीठे, मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ, चंदीगड विद्यापीठ आणि लवली प्रोफेशनल विद्यापीठाने तुर्कीशी असलेले सर्व संबंध तोडले आहेत.
भारतातील व्यापारी आणि ग्राहक तुर्कीहून येणाऱ्या फळांवर बहिष्कार टाकत आहेत. एका ग्राहकाने एएनआयशी बोलताना म्हटले की, जो देश आपल्या देशासोबत उभा राहत नाही त्याला आपण कसे पाठिंबा देऊ शकतो. सामान्य जनता प्रत्येक गोष्टीवर बहिष्कार घालत आहे, म्हणून आपणही त्यावर बहिष्कार टाकला पाहिजे, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
द इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, फ्लिपकार्टच्या मालकीच्या मिंत्रा आणि रिलायन्सच्या मालकीच्या आजिओने ट्रेंडियोल सारख्या तुर्कीच्या मालकीच्या ब्रँडचे कपडे विकणे बंद केले आहे. मिंत्रा प्लॅटफॉर्मवर शोधल्यावर तुर्की-आधारित ब्रँड ट्रेंडिओलची उत्पादने दिसत नाहीत.
'बॉयकॉट तुर्की' चळवळीला वेग येत असतानाच, ४.५ लाख एफएमसीजी वितरकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऑल इंडिया कंझ्युमर प्रोडक्ट्स डिस्ट्रिब्युटर्स असोसिएशनने अनेक तुर्की वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे, असे मनीकंट्रोलच्या अहवालात म्हटले आहे. बंदी घातलेल्या उत्पादनांमध्ये टर्किश चॉकलेट, वेफर्स, जॅम, सिरप, चहा, कॉफी, कुकीज, केक आणि डबाबंदी मिठाई यांचा समावेश आहे. इतकंच नाही तर, बॉडी वॉश, वेट वाईप्स, कॉस्मेटिक्स आणि स्किनकेअर सारख्या उत्पादनांवरही बंदी घातली जाईल.
मेकमायट्रिपच्या प्रवकत्याने सांगितले की, गेल्या एका आठवड्यात तुर्की आणि अझरबैजानला जाणाऱ्या विमान बुकिंगमध्ये ६० टक्क्यांनी घट झाली आहे. तर, प्रवास रद्द होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. तुर्कीसोबत, अझरबैजाननेही भारतासोबतच्या संघर्षात पाकिस्तानला पाठिंबा दिला होता.
१५ मे रोजी ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीने (BCAS) ग्राउंड हँडलिंग आणि कार्गो सेवा प्रदात्या सेलेबीची सुरक्षा मंजुरी रद्द करत तुर्कीला पहिला अधिकृत धक्का दिला. या निर्णयानंतर, सेलेबीसोबत काम करणाऱ्या नऊ विमानतळांपैकी बहुतेक विमानतळांनी या कंपनीशी संबंध तोडले आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, एअर इंडियाने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला प्रतिस्पर्धी इंडिगोचा तुर्की एअरलाइन्ससोबतचा भाडेपट्टा करार थांबवण्याची विनंती केली आहे.