भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 09:31 IST2025-05-20T09:27:20+5:302025-05-20T09:31:50+5:30

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ४ दिवसांच्या सैन्य संघर्षाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. ६ मे रोजी रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च करत पाकिस्तानातील दहशतवादी तळांना टार्गेट केले. त्यानंतर बिथरलेल्या पाकिस्ताननेही भारताच्या नागरी वस्तीत हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली.
१० मे रोजी भारत-पाकिस्तान यांच्यात सीजफायरची घोषणा झाली. त्यानंतर दोन्ही देशांनी वेगवेगळे दावे केले. मात्र भारत-पाकिस्तान संघर्षात चीनचे नावही चर्चेत राहिले. चीनच्या काही एक्सपर्टनुसार, या संघर्षात खरा विजय चीनचा झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, भारत-पाक यांच्यातील संघर्षात चीनच्या संरक्षण उद्योगाला अप्रत्यक्षपणे मोठा फायदा झाला. त्याचे कारण म्हणजे पाकिस्तानने या लढाईत चिनी शस्त्रांचा वापर केला होता. त्यातून चीनच्या शस्त्र उद्योगाला चालना मिळू शकते. विशेषत: चिनी लढाऊ विमानांसाठी या संघर्षातून फायद्याचा सौदा झाल्याचे म्हटलं जाते.
भारत-पाकिस्तान यांच्यातील ४ दिवसांच्या संघर्षात ड्रोन, मिसाईल, लढाऊ विमानांचा वापर केला गेला. भारताने फ्रान्स, रशियात बनवलेल्या विमानांचा वापर केला तर पाकिस्तानने चीनकडून मिळालेले J-10, J-17 विमानांना मैदानात उतरवले. दोन्ही देशांनी एकमेकांची सीमा ओलांडली नाही, आपापल्या हवाई क्षेत्रातून मिसाईल डागल्या असं सांगण्यात येते.
काही संरक्षण तज्ज्ञांच्या मते, चिनी शस्त्रे उद्योगासाठी डिपसीक मोमेंट आहे. हवाई लढाईत चिनी शस्त्रांचा वापर एक मोठी जाहिरात आहे. आतापर्यंत चीनच्या त्यांची शस्त्रे युद्धात वापरण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे भारत-पाक लढाईत सहभागी न होताही चीनने त्यांची ताकद जगाला दाखवली असं बीजिंगमधील विश्लेषक झोउ बो यांनी सांगितले.
चिनी विमान उत्पादन कंपनी चेंगदू एअरक्राफ्टला भारत-पाकिस्तान संघर्षाचा फायदा झाला. या कंपनीचे शेअर्स वेगाने वाढले. परंतु काही विश्लेषकांच्या मते चिनी शस्त्रांना श्रेष्ठ म्हणणं घाईचे ठरेल असं म्हटलं. लंडनच्या किंग्स कॉलेजचे प्रोफेसर वॉल्टर लैडविग यांनी भारत-पाकिस्तान संघर्षात चिनी विमानांना आघाडी घेता आली का हे स्पष्ट नाही असं सांगितले.
चीन सोशल मीडियावर असे संदेश व्हायरल करत आहे की, भारत-पाक संघर्षात चिनी शस्त्रांमुळे पाकला फायदा झाला असं कौतुक करत आहेत. उपलब्ध माहितीनुसार कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहचू शकत नाही परंतु या संघर्षात चीन विजेता झाला अशी वातावरण निर्मिती केली जात आहे असं वेरोनातील इंटरनॅशनल टीम फॉर द स्टडी सिक्युरिटीचे संशोधक कार्लोटा रिनाउडो यांनी म्हटलं.
भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षाचा जागतिक शस्त्रे व्यापारावर परिणाम होऊ शकतो. सध्या अमेरिका जगातील सर्वात मोठा शस्त्र निर्यातदार देश आहे. चीन यात चौथ्या क्रमांकावर आहे. चीनने आतापर्यंत म्यानमार आणि पाकिस्तानसारख्या देशांना त्यांची शस्त्रे विकली आहेत.
चिनी बनावटीच्या शस्त्रांमध्ये बऱ्याचदा तांत्रिक बिघाडामुळे टीकाही झाली आहे. परंतु भारत-पाकिस्तान संघर्षामुळे चिनी शस्त्रांवर अशा देशांचा विश्वास बसू शकतो ज्यांनी आतापर्यंत अमेरिका अथवा पाश्चात्य देशांकडून शस्त्रे खरेदी केली आहेत. त्यामुळे आगामी काळात चीनला संरक्षण क्षेत्रात तगडी कमाई करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.