डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 12:39 IST2025-10-16T12:35:07+5:302025-10-16T12:39:45+5:30

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प ज्या ब्राझीलवरती चिडतात, त्याच ब्राझीलला भारत आकाश मिसाइल सिस्टम विकण्याची तयारी करत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ब्राझीलचे उपराष्ट्रपती यांच्याशी चर्चा करून हा प्रस्ताव ठेवला आहे.

आकाश मिसाइल भारताने स्वत: बनवली असून ती जमिनीतून हवेत मारा करण्यास सक्षम आहे. शत्रूचे विमान, ड्रोन अथवा क्रूज मिसाइलला ४५ किमी दूर अंतरावरूनही आकाश मिसाइल मारू शकते. डीआरडीओने हे बनवले आहे. स्वस्त आणि विश्वसनीय असल्याने अनेक देश ही मिसाइल खरेदी करण्यासाठी इच्छुक आहेत.

मे २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर हाती घेतले. यात आकाश मिसाइल सिस्टमने पाकिस्तानी ड्रोन आणि मिसाइलला नष्ट करण्याची कमाल केली. विशेषत: पश्चिम भारतातील शहरांचं संरक्षण आकाश मिसाइलने केले.

ऑपरेशन सिंदूरमुळे भारताची शस्त्रे बनवण्याची क्षमता जगासमोर आली. आता यातील यशामुळे भारताला शस्त्रविक्री करण्यासाठी मोठी संधी मिळाली आहे. आज दिल्लीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ब्राझीलचे उपराष्ट्रपती जेराल्डो अल्कमिन यांची भेट घेतली.

ब्राझीलचे संरक्षण मंत्री जोस मूसियो मोंटेरो हेदेखील या बैठकीवेळी उपस्थित होते. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्य करण्यावर भर देण्यात आला. या भेटीत भारताने आकाश मिसाइल सिस्टम विक्रीचा प्रस्ताव ब्राझीलसमोर ठेवला आहे. त्याशिवाय शस्त्रांचा संयुक्त विकास आणि उत्पादन यावरही चर्चा करण्यात आली. या दोन्ही देशांनी सैन्य सराव, प्रशिक्षण याची देवाणघेवाण करण्याचंही आश्वासन दिले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबतही बैठक भारत आणि ब्राझील यांच्यातील रणनीती भागीदारी आणखी मजबूत करणार आहे.

भारत आणि ब्राझील २००३ पासून रणनीती भागीदार आहेत. दोन्ही देश जी २०, ब्रिक्ससारख्या संघटनेत एकत्रित आहेत. ब्राझील दक्षिण अमेरिकेतील मोठा देश आहे. त्यांच्या सैन्याला मजबूत शस्त्र हवी आहेत. आकाश सारखी मिसाइल ब्राझीलच्या हवाई संरक्षणाला बळ देईल.

भारत पाकिस्तान यांच्यातील संघर्षानंतर ऑपरेशन सिंदूरमुळे भारताची ताकद जगाला दिसली. भारत आता शस्त्र निर्यात करण्यासाठी पुढे आला आहे. यात २५ हजार कोटींची निर्यात करण्याचं टार्गेट ठेवले आहे. त्याच दिशेने भारत ब्राझील यांच्यातील चर्चेचं पाऊल ठेवण्यात आले आहे.

डोनाल्ड ट्रम्प ब्राझीलवर का चिडतात?- जुलै २०२५ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझीलवर अतिरिक्त ४० टक्के टॅरिफ लावला. ज्यामुळे आधीच्या १० टक्क्यांसह तो ५० टक्क्यांपर्यंत पोहचला. ब्राझील अमेरिकेला नुकसान पोहचवत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं होते. अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्राझीलचे राष्ट्रपती लूला यांच्याशी फोनवर संवाद साधला, मात्र अद्यापही दोन्ही देशांमध्ये संबंध सुधारले नाहीत. त्यात अमेरिकेचा दबाव असतानाही भारत आणि ब्राझील यांच्यात संरक्षण करार होणे महत्त्वाचे मानले जाते.

जर भारत ब्राझील यांच्यात डील झाली तर भारतातील शस्त्र निर्यात वाढेल. आकाश आधीच आर्मेनियाला विकण्यात येत आहे. ब्राझीलमुळे नवीन खरेदीदार मिळेल. त्यामुळे भारत आता शस्त्र खरेदीदार नाही तर निर्यातदार देशही होईल. पर्यावरण, व्यापार, संरक्षण प्रत्येक क्षेत्रात सहकार्य वाढेल. परंतु अमेरिकेचा दबावही आव्हानात्मक ठरेल.

ही बातमी भारताच्या संरक्षण क्षमता आणि राजनैतिकतेसाठी प्रेरणादायी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या संतापानंतरही भारत ब्राझीलला बळकट करण्यास तयार आहे. आकाश क्षेपणास्त्रासारख्या तंत्रज्ञानामुळे मेक इन इंडियामध्ये जगाची शक्ती दिसून येते.