एजंटविना साडे नऊ कोटींचे घर फक्त ७२ तासांत विकले; 'ChatGPT'मुळे झाला कोट्यवधीचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 15:25 IST2026-04-03T14:03:43+5:302026-04-03T15:25:10+5:30

एखाद्या साध्या कॉम्प्युटर प्रोग्राममुळे करोडो रुपयांचा व्यवहार एका झटक्यात पूर्ण होऊ शकतो का? अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये असाच एक प्रकार घडलाय, ज्याची चर्चा आता संपूर्ण जगभरातल्या रियल इस्टेट क्षेत्रात सुरू आहे.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सध्या जगभरात काय चमत्कार घडवू शकते, याचे एकामागून एक थक्क करणारे कारनामे समोर येत आहेत. तंत्रज्ञानाच्या या युगात आता घर खरेदी-विक्रीसाठी महागड्या एजंट्सची गरज उरली आहे की काय, असा प्रश्न पडण्यासारखी घटना अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात घडली आहे.

मियामी येथील रॉबर्ट लेविन या व्यक्तीने कोणत्याही मध्यस्थाशिवाय केवळ 'एआय'च्या मदतीने आपले घर तब्बल १ मिलियन डॉलर्सला (सुमारे ९.५ कोटी रुपये) विकून सर्वांना चकित केले आहे.

रॉबर्ट लेविन यांना आपले घर विकायचे होते. त्यांनी सुरुवातीला स्थानिक रिअल इस्टेट एजंट्सकडे चौकशी केली. एजंट्सनी घराची जी किंमत सांगितली होती, त्यापेक्षा 'एआय'च्या सल्ल्यामुळे लेविन यांना तब्बल १ कोटी रुपये जास्त मिळाले. महत्त्वाचे म्हणजे, ज्या व्यवहारासाठी महिने लागतात, तो व्यवहार केवळ ३ दिवसांत पूर्ण झाला.

लेविन यांनी आपले घर विकण्यासाठी चॅटजीपीटीला आपला मार्गदर्शक बनवले. त्यांनी चॅटजीपीटीवर मार्केटचा डेटा तपासून घराची अचूक व्हॅल्यू काढली. तसेच घराचे वर्णन आणि मार्केटिंग कंटेंट लिहिण्यासाठी एआयची मदत घेतली.

चॅटजीपीटीने सुचवलेले छोटेखानी बदल केल्यामुळे प्रॉपर्टीचे मूल्य लगेच वाढले. घर मार्केटमध्ये कधी आणायचे, याचा अचूक सल्लाही एआयने दिला.

या सल्ल्यामुळे घर लिस्ट केल्यावर अवघ्या ७२ तासांत लेविन यांच्याकडे ५ खरेदीदारांच्या ऑफर्स रांगा लागल्या. यामुळे एजंटला द्यावे लागणारे लाखो रुपयांचे कमिशन तर वाचलेच, शिवाय जास्तीचा नफाही मिळाला.

जरी लेविन यांनी मार्केटिंग आणि किमतीसाठी एआयचा वापर केला असला, तरी कायदेशीर कागदपत्रांच्या बाबतीत त्यांनी कोणतीही जोखीम पत्करली नाही.

"एआय तज्ज्ञांची जागा पूर्णपणे घेऊ शकत नाही. त्यावर १०० टक्के विसंबून राहणे धोक्याचे ठरू शकते," असा इशारा त्यांनी दिला आहे. म्हणूनच त्यांनी तांत्रिक कामासाठी एआय वापरले असले तरी, अंतिम करारासाठी वकिलाचाच सल्ला घेतला.