कतार : एकेकाळी गरीब देश, आज जगातील श्रीमंत देशांमध्ये स्थान, असे बदलले नशीब!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 10:18 AM2022-11-19T10:18:42+5:302022-11-19T10:22:20+5:30

Fifa World Cup 2022: विशेष म्हणजे या देशातील जनतेला आयकर भरावा लागत नाही. जर आपण इतर करांबद्दल बोललो तर ते फक्त नावापुरतेच आहेत.

फिफा (FIFA) विश्वचषक 2022 कतारमध्ये (Qatar) 20 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होणार आहे. कतारने विश्वचषकाच्या यजमानपदासाठी जोरदार तयारी केली आहे. कारण, फुटबॉल जगातील बहुतेक देशांमध्ये लोकप्रिय आहे, अशा परिस्थितीत फिफा विश्वचषकासोबतच कतारचे नावही लोकांच्या ओठावर येत आहे.

फिफा विश्वचषकाचे आयोजन करणारा कतार एकेकाळी अत्यंत गरीब होता. मात्र आज या देशाची गणना श्रीमंत देशांमध्ये होत आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे. मध्य-पूर्व आशियातील या देशात गरिबी नगण्य आहे. याठिकाणी लोकांना आयकरही भरावा लागत नाही. या देशाचा गरीबीतून समृद्धीकडे प्रवास कसा झाला त्याबद्दल जाणून घेऊया...

कतार तीन बाजूंनी समुद्राने आणि एका बाजूने सौदी अरेबियाने वेढलेला आहे. कतारला आधी तुर्की आणि नंतर ब्रिटनने गुलाम बनवले. कतार 1971 साली ब्रिटनपासून स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची स्थिती चांगली नव्हती.

कतारमध्ये गरिबी खूप होती, पण येथील राज्यकर्त्यांनी देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केले.आता परिस्थिती अशी आहे की, अमेरिका, दुबई आणि सौदी अरेबियापेक्षा कतारमध्ये जास्त श्रीमंत लोक राहतात.

कतारमधील प्रत्येक तिसरा व्यक्ती करोडपती आहे आणि तो वर्षाला 94 लाख रुपये कमावतो. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत कतारचा जगात 5वा क्रमांक लागतो. या देशाची लोकसंख्या जवळपास 28 लाख आहे. यामध्ये केवळ 12 टक्के म्हणजेच सुमारे 3,36,000 लोक कतारचे मूळ रहिवासी आहेत.

नॅच्युरल गॅस पुरवठ्याच्या बाबतीत कतार हे सर्वात मोठे नाव आहे. हा जगातील सर्वात मोठा निर्यातदार आहे. या निर्यातीमधून कतारला भरपूर कमाई मिळते. याचा लाभ येथे राहणाऱ्या लोकांनाही मिळतो.

विशेष म्हणजे या देशातील जनतेला आयकर भरावा लागत नाही. जर आपण इतर करांबद्दल बोललो तर ते फक्त नावापुरतेच आहेत. येथे लोकांना वीज, पाणी आणि वैद्यकीय सुविधा मोफत मिळतात.