तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 18:38 IST2025-06-23T18:34:43+5:302025-06-23T18:38:47+5:30
Yemen Officially Jumps Into The Iran-Israel War : अमेरिकेच्या इराणवरील हवाई हल्ल्यानंतर या देशाने ही घोषणा केली आहे...!

इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेनंतर आता आणखी एका देशाने उडी घेतली आहे. येमेनने आधिकृतपणे या युद्धात भाग घेत असल्याची घोषणा केली आहे. त्याने अमेरिका आणि इस्रालविरुद्ध इरानला समर्थन दिले आहे.
येमेन सशस्त्र दलाचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याह्या सरिया यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही घोषणा केली. या घोषणेमुळे तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती आणखी वाढली आहे.
गेल्या १३ जूनपासून सुरू झालेल्या इराण आणि इस्रायलमधील युद्धात येमेन आता अधिकृतपणे सामील झाला आहे. येमेनी सशस्त्र दलाचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याह्या सरिया म्हणाले, "येमेन आता अधिकृतपणे अमेरिका आणि इस्रायलविरुद्धच्या युद्धात उतरला आहे. आपली जहाजे आमच्या सागरी सीमेपासून दूर ठेवा."
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्याने येमेन भडकला - अमेरिकेच्या इराणवरील हवाई हल्ल्यानंतर येमेनने ही घोषणा केली आहे. अलिकडेच, अमेरिकन सैन्याने 'ऑपरेशन मिडनाईट हॅमर' अंतर्गत इराणच्या फोर्दो, इस्फहान आणि नतांज या अणुतळांवर हल्ला करून युद्धाला एका नव्या पातळीवर नेले आहे. याशिवाय, इस्रायली सैन्यानेही सोमवारी फोर्दो अणुकेंद्रांवर हवाई हल्ला केला.
येमेनने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, "इस्रायल अमेरिकेच्या सहकार्याने संपूर्ण प्रदेश अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही या विरोधात उभे आहोत आणि इशारा देतो की, आमच्या जल सीमेची अवहेलना करणे धोकायदाक ठरेल."
येमेनी सशस्त्र दलांनी शनिवारीही गाझा, लेबनॉन, सीरिया आणि इतर अरब आणि इस्लामिक देशांवरील इस्रायली हल्ल्यांचा निषेध करणारे अधिकृत लष्करी निवेदनही जारी केले होते.
या घडामोडीने पश्चिम आशियातील तणावात आणखी भर पडली आहे. युद्धातील येमेनची औपचारिक उडी अमेरिका आणि इस्रायलसाठी एक नवीन आव्हान बनू शकते. कारण, सध्या इस्रायल एकाच वेळी गाझा, लेबनॉन आणि आता थेट इराणविरुद्ध लढत आहे.