दसऱ्याच्या मुहूर्तावर UAE मध्ये हिंदू मंदिराचं उद्धाटन; भव्यता पाहून दिपतात डोळे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 05:14 PM2022-08-11T17:14:18+5:302022-08-11T17:16:52+5:30

संयुक्त अरब अमीरात दुबईमध्ये बनवण्यात आलेले हिंदू मंदिर जगात चर्चेत आले आहे. ५ ऑक्टोबरला हे भव्यदिव्य मंदिर खुले होणार आहे. या मंदिरात हिंदू धर्माच्या १६ देवी-देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्याशिवाय धार्मिक कार्यक्रमासाठी सामुहिक केंद्र बनवण्यात आले आहे. ५ ऑक्टोबर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर हे मंदिर भाविकांसाठी खुले होईल असं सिंधु गुरु दरबार मंदिरचे ट्रस्टी राजू श्रॉफ यांनी सांगितले आहे.

हे मंदिर जेबेल अली अमीरातच्या कॉरिडोर ऑफ टॉलरेसमध्ये आहे. हिंदू मंदिराशिवाय याठिकाणी शिखांची एक गुरुद्वारा, हिंदू मंदिर आणि अनेक चर्च आहे. यूएई सरकारचे अनेक अधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या मंदिराचं उद्धाटन समारंभ पार पडणार आहे. दोन टप्प्यात मंदिर भाविकांसाठी खुले होणार आहे. पहिल्या टप्प्यात केवळ जनतेसाठी प्रार्थनास्थळ उघडण्यात येईल असं सांगण्यात आले आहे.

तर मंदिराच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्धाटन पुढील वर्षी १४ जानेवारीला मकर संक्रातीच्या मुहूर्तावर करण्यात येईल. यावेळी जनतेसाठी ज्ञान कक्ष आणि सामुहिक दालनाचं उद्धाटन केले जाईल. मंदिरात येणाऱ्या भाविकांना लग्न, पूजापाठ यासारख्या खासगी कार्यक्रमासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती मंदिर समितीचे सदस्य अशोक कुमार डब्ल्यू यांनी दिली.

त्याशिवाय मंदिरात १ हजार ते १२०० लोक सहजपणे पूजा करू शकतील अशी व्यवस्था आहे. हिंदू सण उत्सवात मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी होऊ शकतील अशी व्यवस्था मंदिरात करण्यात आली आहे. विकेंडमध्ये अबूधाबीहून अनेक हिंदू भाविक हे मंदिर पाहण्यासाठी गर्दी करतील अशी अपेक्षा मंदिर ट्रस्टींना आहे.

मंदिरात प्रवेश करण्यासाठी प्रशासनाने क्यू आर कोड आधारित सुरक्षा प्रणाली उभारली आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांना सप्टेंबरपासून क्यू-आर कोड बुकींग करू शकतील. मंदिराच्या वेबसाईटवर क्यू आर कोड उपलब्ध असेल. मंदिरात दर्शनासाठी वेळ सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत असेल. ५ ऑक्टोबरपासून मंदिर सर्वसामान्यांसाठी खुले असेल. त्याआधी भाविकांना कशाप्रकारे मंदिरात प्रवेश मिळेल याबाबत जनजागृती केली जात आहे.

मंदिराच्या पहिल्या मजल्यावर प्रार्थना सभागृह असेल. ज्याठिकाणी हिंदू देवी-देवतांच्या १६ मूर्त्या असतील. त्याठिकाणी देवतांची पूजा केली जाईल. त्याचसोबत शिखांच्या पवित्र किताब गुरु ग्रंथ साहिब ठेवण्यासाठी वेगळ्या कक्षाची व्यवस्था आहे. मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दर्शनासाठी येतील. जर आम्ही एकत्र मंदिरातील सर्व गोष्टी खुल्या केल्या तर गर्दी नियंत्रणात ठेवणे कठीण होईल असं मंदिर ट्रस्टी श्रॉफ यांनी म्हटलं.

या मंदिरात ४ हजार स्क्वेअर फूट बॅक्वेंट हॉल आहे. त्यासोबत इतरही दालने आहेत. सार्वजनिक सभामंडपही आहे. त्याठिकाणी एलसीडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या मजल्यावर तुळशीच्या वृक्षासोबत ९ वेगवेगळ्या ग्रहांच्या स्थानाचीही व्यवस्था केली आहे. सर्व सुविधा १४ जानेवारीपासून सुरू होतील. हिंदू मंदिरात दिवाळी, नवरात्रीसारख्या उत्सवांचे आयोजन करण्यात येणार आहे.

विविध धर्माचे कारागीर या मंदिराच्या कामात गुंतलेले आहेत. या मंदिराची समकालीन रचना पारंपरिक हिंदू मंदिराचे मूळ स्वरूप कायम ठेवते. अमिराती-भारतीय टच देण्यासाठी आम्ही मंदिराच्या स्थापत्य रचनेत मशरबिया पॅटर्न सारख्या विविध अरबी घटकांचा समावेश केला आहे असं मंदिराचे संचालक एन मोहन यांनी म्हटलं.

नऊ उंच खांब, सुशोभित केलेले खांब आणि पांढऱ्या संगमरवरी हस्तकला शिल्प या समृद्ध मंदिराच्या आतील आणि बाह्य भागाचा भाग आहेत. मंदिराचे मोठे लाकडी दरवाजे आणि काँक्रीटचे उंच खांब घंटा, हत्ती आणि फुलांनी सजवलेले आहेत.

मंदिराच्या मध्यवर्ती व्यासपीठावर, मध्यभागी शंकरासह इतर १५ देवता असतील. दक्षिण भारतीय देवता, गुरुवायूरप्पन आणि अय्यप्पन यांच्यासह गणेश, कृष्ण, महालक्ष्मी अशा इतर देवतांचीही प्रार्थना सभेत स्थापना केली जाणार आहे. मंदिरात दक्षिण भारतातील देवदेवतांपासून ते पूर्वेकडील देवतांपर्यंतच्या मूर्ती असाव्यात यासाठी आम्हाला विविध समाजातील देवी-देवतांच्या मूर्ती ठेवण्याची इच्छा होती. येथे सर्व धर्माच्या लोकांचे स्वागत आहे. मंदिरात शिखांचा पवित्र ग्रंथ गुरू ग्रंथ साहिबचाही भाग असेल असंही सांगण्यात आले आहे.