डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यात एस जयशंकर यांचा जलवा, अनेक नेत्यांनी घेतली भेट...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 17:18 IST2025-01-21T17:12:52+5:302025-01-21T17:18:39+5:30
Donald Trump Inauguration: आता अमेरिकेसह संपूर्ण जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललाय. भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळेच कुठल्याच देशाला भारताकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

Donald Trump Inauguration: डोनाल्ड ट्रम्प यांनी काल(20 जानेवारी) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात जगभरातील अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी, उद्योगपतींनी हजेरी लावली. भारताकडून परराष्ट्र मंत्री एस जयशंकर गेले होते. विशेष म्हणजे, या सोहळ्यात जयशंकर यांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते. त्यांनी फक्त या शपथविधी सोहळ्यालाच हजेरीच लावली नाही, तर भारताचे वाढते महत्वही दाखवून दिले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. त्यांचा शपथविधी सोहळा कॅपिटल रोटुंडा (संसदेच्या मध्यवर्ती कक्ष) येथे पार पडला. या सोहळ्याला अनेक व्हीव्हीआयपींची मांदीयाळी पाहायला मिळाली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते. हे दृष्य अनेकांसाठी आश्चर्यकारक होते.
बदलत्या भारताचे बदलते चित्र- विशेष म्हणजे एस जयशंकर यांच्यासोबत इक्वेडोरचे राष्ट्रपतीही पहिल्या रांगेत होते. अमेरिकेसाठी भारत किती महत्त्वाचा आहे, हे या चित्रावरून दिसून आले. आता भारत पूर्वीसारखा मागे राहिलेला नाही. आता भारत जगभरात आपले सामर्थ्य दाखवत आहे. त्यामुळेच जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे.
या शपथविधी सोहळ्यात अनेक जागतिक नेत्यांनी एस जयशंकर यांची भेटी घेतली. प्रत्येकजण त्यांना भेटण्यासाठी उत्सुक होता. जयशंकरदेखील सर्व नेत्यांची एकदम अदबीने भेटत होते.
या शपथविधी समारंभात एस जयशंकर अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिली यांच्याशी हस्तांदोलन करताना दिसले. स्वत: एस जयशंकर यांनी त्यांच्या X हँडलवर हा फोटो शेअर केला आहे.
जयशंकर आणखी कोणाला भेटले? एस जयशंकर यांनी या कार्यक्रमादरम्यान जॉन थुन आणि स्पीकर माइक जॉन्सन यांचीही भेट घेतली. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या जपानी समकक्षांचीही भेट घेतली. कार्यक्रमाला उपस्थित असलेले इतर लोकही त्यांना भेटायला येत होते.