coronavirus: कोरोनामुळे निर्माण झालेल्या तणावादरम्यान अमेरिकेचा चीनला तगडा धक्का, केली मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 04:59 PM2020-05-23T16:59:53+5:302020-05-23T17:07:29+5:30

कोरोना विषाणूवरून सध्या अमेरिका आणि चीनदरम्यान, कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.

कोरोना विषाणूवरून सध्या अमेरिका आणि चीनदरम्यान, कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. यादरम्यान अमेरिकेने चीनला तगडा धक्का देताना आर्थिक आघाडीवर मोठी कारवाई केली आहे.

अमेरिकेने चीनच्या ३३ कंपन्या आणि अन्य संस्थांना इकॉनॉमिक ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने शुक्रवारी सांगितले की, माववाधिकारांचे उल्लंघन आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय हिताचा विचार करून ३३ चिनी कंपन्या आणि अन्य संस्थांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

चीनमध्ये उईगर मुस्लिमांवर ठेवलेली हायटेक पाळत आणि जबरदस्तीने काम करून घेणे तसेच लोकांना मनमानी पद्धतीने तुरुंगात डांबून ठेवणे आमि मानवाधिकाराच्या उल्लंघनामध्ये भागीदार असल्यामुळे ९ कंपन्यांवर निर्बंध घालण्यात आले आहे.

अमेरिकी सरकारने सांगितले की, ७ व्यापारी संस्था चीनला हायटेक सर्व्हिलान्स लागू करण्यासाठी मदत करत आहेत. तर चीनच्या २४ सरकारी आणि व्यापारी संस्थांना त्यांनी चीनी लष्कराला मास डिस्ट्रक्शनसंबंधिती हत्यारे विकसित करण्यात मदत केली.

कोरोना विषाणूच्या फैलावावरून अमेरिका आणि चीन एकमेकांवर आरोप करत आहेत. चीनने कोरोना विषाणूशी संबंधित माहिती लपवली. त्यामुळे जगभरात कोरोनाचा फैलाव झाला, असा आरोप अमेरिकेकडून करण्यात येत आहे.

चीनमधील वुहान येथील प्रयोगशाळेमधूनच कोरोनाचा विषाणू जगभरात फैलावला, असे अमेरिकेकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. तसेच यासंदर्भात तपास करण्याची मागणीही अमेरिकेकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र चीनकडून असे आरोप सातत्याने फेटाळून लावण्यात येत आहेत.

जगात आतापर्यंत ५२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेलाच बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंत १६ लाख जणांना कोरोनाची बाधा झाली असून, सुमारे ९६ हजार जणांचा मृत्यू झाला आहे.