coronavirus: म्हणून काही देशात कोरोना ठरतोय जीवघेणा, तर काही ठिकाणी त्याची तीव्रता आहे सौम्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 04:54 PM2020-05-31T16:54:59+5:302020-05-31T17:08:33+5:30

आशियाई देशांच्या तुलनेत युरोप आणि अमेरिकेत कोरोनाची तीव्रता अधिक दिसत आहे. या देशांमध्ये आरोग्य सुविधा उत्तम असूनही मृत्यूचा दर तुलनेने मागास असलेल्या आशियाई देशांपैक्षा अधिक आहे.

चीनपासून सुरू झालेल्या कोरोना विषाणूच्या फैलावाने गेल्या पाच महिन्यांमध्ये संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात ३ लाख ७० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र काही देशांमध्ये कोरोना विषाणू जीवघेणा ठरत आहे. तर काही देशांमध्ये मात्र त्याची तीव्रता कमी दिसत आहे.

आशियाई देशांच्या तुलनेत युरोप आणि अमेरिकेत कोरोनाची तीव्रता अधिक दिसत आहे. या देशांमध्ये आरोग्य सुविधा उत्तम असूनही मृत्यूचा दर तुलनेने मागास असलेल्या आशियाई देशांपैक्षा अधिक आहे. तज्ज्ञांकडून याची विविध कारणे सांगण्यात येत आहेत. ती पुढील प्रमाणे आहेत.

ज्येष्ठ नागरिकांची रोग प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना कोरोनाचा जास्त धोका असतो. जवळपास सर्वच देशांमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. त्यातही आशियाई आणि आफ्रिकी देशांच्या तुलनेत युरोपीय देशांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे येथे कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. मात्र याला जपान आणि ब्राझील हे देश अपवाद ठरले आहेत. ब्राझीलमध्ये तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. पण इथे २७ हजार जणांचा मृत्यू झालाय, तर जपानमध्ये वृद्धांचे प्रमाण लक्षणीय असूनही हजारपेक्षा कमी मृत्यू झाले आहेत.

लठ्ठ लोकांना कोरोनाचा अधिक धोका असल्याचा दावा अनेक अहवालांमधून करण्यात आला आहे. आशियाई देशांच्या तुलनेत पाश्चिमात्य देशात लठ्ठपणाचे प्रमाण अधिक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार २०१६ मध्ये अमेरिकेत १८ वर्षांवरील लोकसंख्येपैकी ३६ टक्के लोकांमध्ये लठ्ठपणा होता. तर इटलीमध्ये एकूण लोकसंख्येपैकी २० टक्के लोकांमध्ये लठ्ठपणा होता. त्या तुलनेत भारत आणि जपानमध्ये केवळ ४ ट्क्के लोकांना लठ्ठपणाचा त्रास आहे. तसेच अन्या आजारांशी झुंजत असलेल्या लोकांनाही कोरोनाचा धोका अधिक आहे.

युरोपमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा संबंध जेनेटिक्सशी असण्याची शक्यता अभ्यासातून वर्तवण्यात आली आहे. कोरोना विषाणू कोशिकांच्या बाह्य आवरणावर एसीई२ रिसेप्टरवर चिकटून संसर्ग फैलावत असतो. मात्र एसीई१ जीनची उपस्थिती एसीई२ ला प्रभावित करते. त्यामुळे एसीई२ रिसेप्टरांची संख्या कमी होते आणि संसर्गाचा धोकाही कमी होतो. आकडेवारीनुसार ज्या देशांमधील लोकांमध्ये एसीई१ जीनची फ्रिक्वेंसी कमी असते तिथे कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यूचा धोका अधिक आहे. विशेषत: युरेपियन देशांमध्ये असे दिसत आहे.

आशियाई देशांमधून युरोपमध्ये पोहोचेपर्यंत कोरोना विषाणूने आपले रूप बदलले होते. त्यामुळे तो अधिक धोकादायक बनला, असे केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले. या विषाणूची ए, बी आणि सी अशी तीन रूपे आहेत. पैकी बी हा पूर्व आशियात पसरला आहे. तर ए आणि सी विषाणूंनी अमेरिका आणि युरोपमध्ये कहर माजवला आहे.

आतापर्यंत झालेल्या अभ्यासानुसार कोरोना विषाणू उष्ण आणि दमट हवामान असलेल्या भागात कमी वेगाने पसरतो. मात्र थंड आणि शुष्क हवामानात त्याची तीव्रता वाढते. त्यामुळेच उष्ण आशियाई देशांपैक्षा युरोप आणि अमेरकेतील थंड हवामानात त्याचा फैलाव अधिक झाला.

विविध देशात करण्यात आलेल्या लॉकडाऊननुसार कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण कमी अधिक प्रमामावर दिसून येत आहे. स्वीडन, इराण आणि तुर्कीसारख्या देशांनी कठोर लॉकडाऊन केले नाही. त्यामुळे तिथे कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर अधिक आहे. मात्र जपानमध्ये कडक लॉकडाऊन नसतानाही कमी मृत्यू झाले आहेत. भारतात सुरुवातीचे २१ दिवस कडक लॉकडाऊन होते. मात्र लॉकडाऊनमधून जसजशी सवलत मिळत गेली तसतसे कोरोनाचे रुग्णही वाढले.