CoronaVirus News: काय सांगता? 'हा' देश कोरोना लसीकरणासाठी तयार; उपसंरक्षणमंत्र्यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 09:04 PM2020-07-21T21:04:36+5:302020-07-21T21:07:59+5:30

संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडलं आहे. जवळपास दीड कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत सहा लाख जणांना कोरोनामुळे प्राण गमवावा लागला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सगळ्यांचं लक्ष लसीसाठी सुरू असलेल्या संशोधनाकडे लागलं आहे. त्यातच ऑक्सफर्ड विद्यापीठानं तयार केलेल्या चाचणीचे तिसऱ्या टप्प्यातले निष्कर्ष उत्साहवर्धक आल्यानं आशा उंचावल्या आहेत.

एका बाजूला ऑक्सफर्ड विद्यापीठानं लसीच्या संशोधनात आघाडी घेतली असताना दुसरीकडे रशियाच्या संरक्षण विभागानं तयार केलेल्या कोरोनावरील लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे.

रशियाच्या संरक्षण विभागानं तयार केलेली लस लवकरच वापरता आणली जाईल, अशी माहिती रशियाचे प्रथम उपसंरक्षण मंत्री रुसलॅन तसालिकोव यांनी दिली. त्यामुळे रशियात लवकरच लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे.

रशियात तयार करण्यात आलेल्या कोरोना लसीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या मानवी चाचण्या काल संपल्या. लस टोचण्यात आलेल्या सर्व व्यक्तींच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढल्याची माहिती रुसलॅन तसालिकोव यांनी दिली.

लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी नेमकी कधी सुरू होणार आणि या लसीचं उत्पादन कधी सुरू होणार याची माहिती मात्र तसालिकोव यांनी दिलेली नाही.

यावर अद्याप रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं कोणतंही भाष्य केलेलं नाही. सध्या कोरोना लसीच्या चाचण्या तयार सुरू असल्याचं वृत्त इंटरफॅक्स वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

'या लसीची तिसरी टप्प्यातील चाचणी अद्याप सुरू झालेली नाही. तशी कोणतीही घोषणादेखील झालेली नाही. मात्र तरी त्यांना इतकी घाई का, हे पूर्णपणे अनाकलनीय आहे,' असं सरकारच्या विषाणूशास्त्र विभागातून कार्यकारी पदावरून निवृत्त झालेल्या सेरगेई नेतेसोव यांनी म्हटलं.

रशियन लष्कर सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या गमालेया संस्था आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून कोरोनावरील लस तयार करत आहे.

लसीच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात हजारो लोकांवर चाचणी घेण्यात येईल. यात रशिया, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातचा समावेश असेल. ३ ऑगस्टपासून ही चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरपासून या लसीचं वितरण सुरू होईल, अशी माहिती आरडीआयएफचे प्रमुख किरिल्ल डिमित्रेव्ह यांनी गेल्याच आठवड्यात आली.

Read in English