CoronaVirus News : कोरोनाचा सुस्साट वेग! शांघाईमध्ये परिस्थिती बिकट; लॉकडाऊनमुळे दिवसातून एकदाच मिळतं जेवण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 02:01 PM2022-04-12T14:01:06+5:302022-04-12T14:20:29+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: शहरात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने खाद्यपदार्थांच्या वितरणात अनेक अडचणी येत आहेत. अन्नपदार्थांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

चीनमध्ये कोरोनाचा सुस्साट वेग पाहायला मिळत असून तो पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. शांघाईमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. लॉकडाऊनमुळे दिवसातून एकदाच लोकांना जेवण मिळतं.

चीनमधील शांघाईमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लोकांची अवस्था दयनीय झाली आहे. शहरात कडक लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने खाद्यपदार्थांच्या वितरणात अनेक अडचणी येत आहेत. अन्नपदार्थांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

मेगा सिटीतील लोक खाण्यापिण्यासाठी तडफडत आहेत. शहरातील नागरिकांना दिवसातून फक्त एकदाच अन्न मिळत आहे. स्थानिक लोकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांना दिवसातून एकदाच जेवण मिळते. ते किती दिवस जिवंत आहेत, हे त्यांनाच माहीत नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोरोनाच्या साथीमुळे शांघाईमधील परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे, झिरो कोविड पॉलिसी लागू करूनही कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही.

कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी सरकारने शांघाईमध्ये कडक लॉकडाऊन लागू केले. शहरातील सर्व लोकांची कोरोना चाचणी करण्यासाठी सरकारने हजारो वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. त्यासाठी लष्कराच्या डॉक्टरांनाही पाचारण करण्यात आले होते.

मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचणी केली जात आहे. असे असूनही शांघाईमध्ये कोरोनाचा संसर्ग अजूनही आटोक्यात येऊ शकला नाही. लोकांना त्यांच्या घरात कैद करण्यास भाग पाडले गेले आहे. झिरो कोविड धोरणांतर्गत येथे कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.

चीनच्या शून्य कोविड धोरणावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, 1 मार्चपासून शांघाईमध्ये 130000 हून अधिक कोविड प्रकरणे नोंदवली गेली आहेत. कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत एकाचाही मृत्यू झालेला नाही.

फक्त एक व्यक्ती गंभीर आजारी आहे. जगभरातील कोरोनाग्रस्त देशांच्या तुलनेत चीनचे असे आकडे पूर्णपणे विरुद्ध आहेत. चीनमुळे पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढलं आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे.

आरोग्य शास्त्रज्ञ डॉ. एरिक फीगल-डिंग यांनी चीनच्या धोरणांवर चिंता व्यक्त केली आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये लोक ओरडताना दिसत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

शांघाईमधील रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरली आहेत. सर्व वॉर्ड भरलेले असून नव्या रुग्णांना जागाच शिल्लक राहिलेली नाही. आरोग्य यंत्रणेवर देखील ताण आला असून प्रशासनाची चिंता वाढली आहे.

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या झीरो कोविड पॉलिसीमुळे लोक आता त्रस्त झाले आहेत. येथे लोकांकडे अन्नपदार्थ देखील शिल्लक राहिलेले नाहीत. एका वयोवृद्ध महिलेने अन्नासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचं देखील सांगितलं आहे.

लोकांनी दावा केला आहे की खाण्या-पिण्याचं सामान संपत आहे. तसेच सुपरमार्केट आणि दुकानातील स्टॉक देखील कमी होत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शांघाईमध्य़े कोरोना संक्रमित असलेल्या लोकांना गायब केलं जात आहे. कारण या लोकांना आयसोलेट करण्यासाठी जागाच शिल्लक नाही. त्यांना दुसऱ्य़ा ठिकाणी पाठवलं जात आहे. कमेंटेटर चेन फेंग याने याबाबत माहिती दिली आहे.

जवळपास 2.6 कोटी लोकसंख्या असलेल्या शांघाई प्रांतातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चिनी सैन्य आणि तब्बल 2,000 हून अधिक वैद्यकीय कर्मचारी पाठवण्यात आले आहेत, जेणेकरून रूग्णांवर उपचार करता येतील.