CoronaVirus News: मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या 'या' औषधांसंदर्भात WHOने दिला गंभीर इशारा; होतील अधिक मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 12:04 PM2020-06-02T12:04:34+5:302020-06-02T12:17:46+5:30

कोरोना महामारीदरम्यान अॅन्टीबायोटिक्सचा अधिक वापर होत असल्याने धोका वाढला आहे. अॅन्टीबायोटिक्सच्या अधिक वापरामुळे बॅक्टेरियाची प्रतिकारशक्ती वाढत आहे. यामुळे आता अधिक मृत्यू होतील, असे जागतीक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे.

theguardian.com ने दिलेल्या वृत्तानुसार, डब्ल्यूएचओचे डायरेक्टर जनरल टेड्रोस एडहेनम घेब्रियेसूस म्हणाले, अॅन्टीबायोटिक्सच्या वापराचा वाईट परिणाम केवळ कोरोना महामारीतच नाही, तर यानंतरही पाहायला मिळेल.

अॅन्टीबायोटिक्सच्या अधिक वापरावर डब्ल्यूएचओने चिंता व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलताना डब्ल्यूएचओने म्हटले आहे, की कोरोना व्हायरस संकटाच्या काळात हा ट्रेंड अधिक वाढू शकतो.

टेड्रोस सोमवारी म्हणाले, अशी अनेक उदाहरणे समोर आली आहेत, की बॅक्टेरियाने संक्रमित असलेल्या रुग्णांवर आता त्या औषधांचा कसलाही परिणाम दिसून येत नाही, ज्या औषधाने ते पूर्वी बरे होत होते.

टेड्रोस म्हणाले, कोरोना महारमारीच्या काळात अॅन्टीबायोटिक्सचा वापर वाढला आहे. यामुळे रुग्णांची आणि मरणारांची संख्या वाढेल.

डब्ल्यूएचओचे डायरेक्टर जनरल म्हणाले, की कोरोनाच्या काही रुग्णांनाच अॅन्टीबायोटिक्सची आवश्यकता असते. त्यांनी डॉक्टरांनाही आवाहन केले आहे, की बॅक्टेरियल इंफेक्शन नसताना, कोरोनाची सामान्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर अॅन्टीबायोटिक थेरपीचा वापर करू नये.

अॅन्टीमायक्रोबियल रेझिस्टन्स यावेळचे सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक आहे, असे टेड्रोस यांनी म्हटले आहे. तसेच हे स्पष्टच आहे, की जग अत्यंत उपयोगी आणि आश्यक असलेल्या अॅन्टीमायक्रोबियल औषधाची क्षमता गमावत आहे.

टेड्रोस असेही म्हणाले, की काही देशांमध्ये अॅन्टीबायोटिक्सचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. तर गरीब देशांमध्ये औषधींची कमतरता असल्याने तेथील लोक समस्यांचा सामना करत आहेत.