CoronaVirus Live Updates : कोरोना हरणार, देश जिंकणार! "लवकरच व्हायरसपासून सुटका होणार"; WHO ने दिली गुड न्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 12:31 PM2022-09-15T12:31:14+5:302022-09-15T12:43:32+5:30

CoronaVirus Live Updates : कोरोनाला हद्दपार करण्याच्या दृष्टीने आजसारखी सकारात्मक स्थिती आतापर्यंत कधी दिसली नाही. कोरोना लवकरच संपुष्टात येऊ शकतो. पण त्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे असं म्हटलं आहे.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असं असताना आता सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या संकटात मोठा दिलासा दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी कोरोनाचा खात्मा होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कोरोना संपण्याच्या दृष्टीनं याआधी अशी सकारात्मक स्थिती दिसून आली नव्हती. परंतु आजवर जगभरात 65 लाखांपेक्षा अधिक लोकांचा जीव घेणाऱ्या कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सर्व देशांनी प्रयत्न सुरू ठेवण्याचा आग्रह डब्ल्युएचओचे प्रमुख डॉ. ट्रेड्रोस घेब्रेसस यांनी केला आहे.

वृत्तसंस्था एएफपीनुसार, डॉ. घेब्रेसस यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. कोरोनाला हद्दपार करण्याच्या दृष्टीने आजसारखी सकारात्मक स्थिती आतापर्यंत कधी दिसली नाही. कोरोना लवकरच संपुष्टात येऊ शकतो. पण त्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे असं म्हटलं आहे.

आपण संधीचा फायदा घेतला नाही तर आपणाला आणखी कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा सामना करावा लागू शकतो. यातून मृत्युंचा आकडा वाढू शकतो, आणखी अडथळे येतील आणि अधिक अनिश्चिततेचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे असं देखील घेब्रेसस यांनी म्हटलं आहे.

2019 मध्ये चीनमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जगभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आता संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्यविषयक संस्थेच्या प्रमुखांनी केलेलं वक्तव्य सर्वांत सकारात्मक मानलं जात आहे.

कोरोना व्हायरस हद्दपार होण्याच्या दृष्टीने त्यांचं मत आशावादी असल्याचंही म्हटलं जात आहे. मागील आठवड्यातील जागतिक रिपोर्टमधील (Weekly Report) कोरोना रुग्णसंख्येचे आकडे पाहता ते मार्च 2020 नंतर सर्वांत नीचांकावर असल्याचंही घेब्रेसस यांनी म्हटलं होतं.

11 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात डब्ल्यूएचओनं एक नवीन अहवाल जारी केला आहे. या आठवड्यात जगभरात कोरोनाचे रुग्ण 28 टक्क्यांनी घटून 31 लाखांवर पोहोचले आहेत. याच्या एक आठवड्यापूर्वी यात 12 टक्क्यांपर्यंत घसरण नोंदवली गेल्याचं एएफपीच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्यने तब्बल 61 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 615,551,842 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 6,523,328 लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर 594,688,167 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.