CoronaVirus Live Updates : कोरोनाची दहशत! 'या' देशात वेगाने पसरतोय व्हायरस; 4 लाख नवे रुग्ण, 432 रुग्णांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 05:03 PM2022-03-30T17:03:05+5:302022-03-30T17:17:45+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना महामारीने जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. सर्वच देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. याच दरम्यान अनेक देशांमध्ये आता पुन्हा एकदा कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 48 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 485,721,063 वर पोहोचली आहे. तर कोरोनाने आतापर्यंत 6,158,070 लोकांचा बळी घेतला आहे.

प्रगत देश देखील कोरोनापुढे हतबल झाले आहे. 421,149,282 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. कोरोना महामारीने जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे.

दक्षिण कोरियामध्ये कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी येथे कोरोना व्हायरसचे 424,641 नवे रुग्ण आढळले आहेत, तर या आजाराच्या संसर्गामुळे 432 लोकांचा मृत्यू झाला आहे.

गंभीर आजारी रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, तसेच ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटचा झपाट्याने प्रसार, चिंतेत भर घालत आहे. कोरिया रोग नियंत्रण आणि प्रतिबंध एजन्सी (KDCA) ने म्हटले आहे की देशात 424,641 नवीन कोरोना संसर्गाची नोंद झाली आहे.

ज्यामध्ये परदेशातील 42 प्रकरणांचा समावेश आहे. कोरोना संसर्गाच्या एकूण रुग्णांची संख्या 1 कोटी 27 लाखांहून अधिक झाली आहे. दक्षिण कोरियाच्या आरोग्य अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या पाच दिवसांनंतर, मंगळवारी दररोज कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.

आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले आहे की ओमायक्रॉन सब व्हेरिएंट BA.2 मुळे संसर्गाची लाट गेल्या आठवड्यात टोकाला पोहोचली होती. 17 मार्च रोजी, दैनंदिन संसर्गाची संख्या 621,197 पर्यंत वाढली होती.

उच्च संसर्गामुळे कोविड-19 मधील मृत्यू आणि गंभीर प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. बुधवारी देशात कोविड-19 मुळे 432 नवीन रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या गुरुवारी झालेल्या 469 मृत्यूनंतरचा हा दुसरा सर्वाधिक दैनिक आकडा आहे.

केडीसीएने सांगितले की गंभीर आजारी रुग्णांची संख्या 86 वरून 1,301 वर पोहोचली आहे. आठवड्यात मृत्यू आणि गंभीर प्रकरणांची संख्या आणखी वाढू शकते. मंगळवारपर्यंत, 32.69 मिलियन किंवा एकूण लोकसंख्येच्या 63.7 टक्के लोकांना बूस्टर शॉट्स मिळाले होते.

पूर्ण लसीकरण झालेल्या लोकांची संख्या 44.48 मिलियन असल्याचं केडीसीएने म्हटलं आहे. गुरुवारपासून, सरकार 5 ते 11 वयोगटातील मुलांना कोविड-19 लसीचे शॉट्स देणे सुरू करणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.