coronavirus:...कोरोनाच्या लसीबाबत अमेरिकेच्या लीक झालेल्या लष्करी कागदपत्रातून धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 04:49 PM2020-05-20T16:49:05+5:302020-05-20T16:59:10+5:30

मात्र कोरोनावरील लस लवकरात लवकर सापडावी यासाठी लक्ष ठेवून असलेल्या जगाला धक्का देणारा खुलासा अमेरिकेच्या लष्करी कागदपत्रांमधून करण्यात आला आहे.

गेल्या साडेचार महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंगसारखे उपाय केले जात आहेत. तर कोरोनावरील लस शोधण्यासाठीही युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

मात्र कोरोनावरील लस लवकरात लवकर सापडावी यासाठी लक्ष ठेवून असलेल्या जगाला धक्का देणारा खुलासा अमेरिकेच्या लष्करी कागदपत्रांमधून करण्यात आला आहे. अमेरिकन संरक्षण मंत्रालयाचे मुख्यालय असलेल्या पेंटॅगॉनच्या कागदपत्रामधील उल्लेखानुसार पुढील वर्षी २०२१ च्या जून-जुलैपर्यंत कोरोनावरील लस मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे तोपर्यंत कोरोना विषाणू कायम राहण्याची आणि त्याचा मोठ्या प्रमाणावर फैलाव होण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात डेली मेलने टास्क अँड पर्पस या संकेतस्थळाच्या हवाल्याने सांगितले की, या कागदपत्रांवर कुणाच्याही स्वाक्षऱ्या नाहीत. हा मेमो सेक्रेटरी ऑफ डिफेंस मार्स इस्पर यांच्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र त्याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

पुढच्या काही महिन्यांपर्यंत जगभरात कोरोनाचा संसर्ग कायम राहील, जोपर्यंत इम्युनायझेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणार इम्युनिटी तयार होत नाही, तोपर्यंत कोरोनाचा फैलाव सुरू राहील.

आपल्याला अजून मोठी वाटचाल करावी लागणार आहे. यादरम्यान, पुन्हा एकदा कोरोनाच्या फैलावाची घटना घडू शकते, असेही या कागदपत्रात म्हटले आहे.

त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा तयार राहावे लागेल. तसेच कोरोनाचा प्रसार झाल्यास आवश्यक ती तयारी ठेवली पाहिजे.

अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाचे १५ लाख २८ हजार ५६६ रुग्ण सापडले आहे. तसेच आतापर्यंत ९१ हजार ९२१ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, अमेरिकेमध्ये कोरोनाच्या लसीबाबत काही पॉझिटिव्ह अहवाल समोर येत आहेत. मात्र ही कोरोनाची लस सर्वसामान्यांपर्यंत कधीपर्यंत पोहोचेल याबाबत अद्याप तरी काही खात्रीशीररीत्या सांगणे शक्य होणार नाही.

Read in English