coronavirus: कोरोनाविरोधात अमेरिका-इंग्लंडला नाही जमले ते इस्राइलने करून दाखवले

By बाळकृष्ण परब | Published: January 2, 2021 02:22 PM2021-01-02T14:22:16+5:302021-01-02T14:35:50+5:30

coronavirus Update : कोरोना विरोधात सुरू असलेल्या या लढाईमध्ये इस्राइल हा वर्ल्ड लीडरच्या रूपात समोर येताना दिसत आहे.

गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या फैलावामुळे संपूर्ण जग त्रस्त झालेले आहे. जगातील मोठमोठे देश कोविड-१९ या विषाणूसमोर हतबल झाल्याचे दिसत आहे. मात्र आता कोरोनावरील लस अनेक देशांत उपलब्ध होऊ लागल्याने ही आपत्ती आता थांबेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, कोरोना विरोधात सुरू असलेल्या या लढाईमध्ये इस्राइल हा वर्ल्ड लीडरच्या रूपात समोर येताना दिसत आहे. इस्राइलमध्ये कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. देशात आतापर्यंत ११.५ टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणारा इस्राइल हा जगातील पहिला देश ठरला आहे. इस्राइलने देशातील ६० वर्षांहून अधिक वयाच्या ४१ टक्के लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेत ०.८ टक्के आणि इंग्लंडमध्ये १.४ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

इस्राइलमध्ये २० डिसेंबर रोजी लसीकरणाला सुरुवात झाली होती. त्यानंतर पुढच्या १० दिवसांत इस्राइलमध्ये नागरिकांना मोठ्या संख्येने लस देण्यात आली आहे. इस्राइलमधील सुमारे १० लाख नागरिकांना आतापर्यंत फायझरची कोरोनावरील लस दिली गेली आहे.

डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार इस्राइलची लोकसंख्या सुमारे ८७ लाख एवढी आहे. मात्र आतापर्यंत देशातील ११.५६ टक्के लोकसंख्येला कोरोनावरील लस मिळाली आहे. मोठ्या संख्येने लोकांना कोरोनावरील लस देण्यात आल्याने इस्राइलमधील कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या कमी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इस्राइलने कोरोनाविरोधात लढण्यासाठी देशात दोनवेळा राष्ट्रीय स्तरावरील लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. तर लसीकरणाची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी स्वत: पहिली लस घेतली होती.

इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी जानेवारी महिन्यात देशातील २२ लाख लोकांना कोरोनाची लस दिली जाईल, असे सांगितले आहे. मात्र वेगाने लसीकरण होत असल्याने लसीची कमतरता जाणवू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत इस्राइलमध्ये कोरोनाचे ४ लाख २६ हजार रुग्ण सापडले आहेत. तर ३ हजार ३३८ जणांचा मृत्यू झाला आहे.