coronavirus: कोरोनाचा मानवी मेंदूवर होतोय असा परिणाम, नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 05:39 PM2020-08-07T17:39:22+5:302020-08-07T17:50:47+5:30

कोरोनामुळे मानसिक तणाव हा कशाप्रकारे गंभीर रूप धारण करत चालला आहे याची धक्कादायक माहिती एका नव्या संशोधनामधून समोर आली आहे.

सध्या संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा कोरोना विषाणूचे थैमान सुरू आहे. या कोरोना विषाणूचा परिणाम लोकांच्या शरीरावरच नाही तर मनावरही होत आहे. सध्याच्या परिस्थितीत थोडाफार तणाव येणेस्वाभाविक आहे. मात्र असा तणाव जास्त होतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या दिनचर्चेवर पडतो. मानसिक तणाव हा कशाप्रकारे गंभीर रूप धारण करत चालला आहे याची धक्कादायक माहिती एका नव्या संशोधनामधून समोर आली आहे.

याबाबतची माहिती अमेरिकन सायकोलॉजिस्ट नियतकालिकामध्ये प्रकाशित झाली आहे. या संशोधनामध्ये पूर्वीपासून कुठल्याही आजाराशी झुंजत असलेल्या व्यक्ती, ७० वर्षांच्या आसपासच्या वयोगटातील व्यक्ती, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेले आणि गर्भवती महिलांचा अभ्यास करण्यात आला. संशोधनादरम्यान, अभ्यासकांनी ८४२ लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून काही प्रश्न विचारले. हे प्रश्न कोरोना विषाणू आणि लॉकडाऊनच्या संदर्भातील होते.

या प्रश्नांची उत्तरे देणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. त्यांचे सरासरी वय हे ३८ वर्षांच्या आसपास होते. सर्वेत सहभागी झालेल्या २२ टक्के लोकांनी आपल्या चिंताजनक मानसिक स्थितीबाबत माहिती दिली. यामध्ये तणाव, डिप्रेशन आणि मूड स्विंगसारखी लक्षणे होती. दरम्यान, लॉकडाऊन दरम्यान लोकांनी मोठ्या प्रमाणात तणाव आमि डिप्रेशनचा सामना केला, हा तणाव मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही कारणांमुळे होता, असे माहितीचे विश्लेषण केल्यानंतर संशोधकांना दिसून आले.

डॉक्टरांनी पूर्णपणे आश्वस्त केल्यानंतरही १५ टक्के लोक आपल्याचा कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, या भीतीने तणावाखाली होते. तसेच आधीपासूनच काही आजारांचा सामना करत असलेल्या तसेच वयस्कर व्यक्तींमध्ये तब्येतीबाबतची चिंता अधिक दिसून आली. तसेच याच वयोगटामधील लोकांमध्ये डिप्रेशनचे प्रमाणही अधिक दिसून आले.

कुठलीही व्यक्ती कुठल्याही अनिश्चित स्थितीचा सामना करण्याची व्यक्तीची क्षमता कशी आहे यावर खराब मानसिक आरोग्य अवलंबून आहे, अशेही संशोधकांना दिसून आले. सध्याच्या परिस्थितीतील आव्हानांचा मानसशास्त्रीय पद्धतीने सामना करता येऊ शकेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, मानसोपचारांची मदत घेतल्याने मेंदूवर सकारात्मक परिणाम दिसून येतो आणि व्यक्तीला अशा परिस्थितीचा सामना करण्यास मदत मिळते, अशा निष्कर्ष या अभ्यासामधून संशोधकांनी काढला आहे. तसेच संशोधकांनी वयस्कर आणि आधीपासून आजारी असलेल्यांच्या मानसिक आरोग्याचा अभ्यास करण्यासाठी एका विशेष योजनेवरही भर दिला. कारण संशोधनामध्ये डिप्रेशनची तक्रार याच वयोगटातील लोकांनी केली होती.

यापूर्वीही झालेल्या अशाप्रकारच्या संशोधनामध्ये कोरोना, लॉकडाऊन आणि क्वारेंटाइनचा लोकांवर वाईट परिणाम पडत असल्याचा निष्कर्ष मांडण्यात आला होता. दरम्यान, चीनमधील एका अभ्यासानुसार कोरोनाच्या संसर्गास सुरुवात झाल्याच्या पहिल्या महिन्यात सुमारे २५ टक्के लोक मानसिक त्रासाचा सामना करत होते. उत्तरोत्तर हे प्रमाण वाढत गेले.