Coronavirus: पाकिस्तानी लष्करासोबत मिळून चीनचं मोठं षडयंत्र?; भारतासह जगाचं टेन्शन वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 07:41 AM2022-04-24T07:41:25+5:302022-04-24T08:07:41+5:30

चीनमध्ये सध्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. अधिकृत माहितीनुसार चीनमध्ये साडेतीन लाखांहून अधिक नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे संपूर्ण चीनमधील ४५ शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अनेक लोकांना घरांत सक्तीने डांबून ठेवण्यात आले आहे. नियम मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जात आहे.

संपूर्ण जगात कोरोना महासाथ पसरवण्यासाठी कारणीभूत ठरलेला चीन आता पाकिस्तानी लष्कराबरोबर कोरोनासदृश विषाणू बनविण्याच्या तयारीत आहे. चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि पाकिस्तानी लष्कराच्या अधीन असलेल्या डिफेन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑर्गनाझेशन यांनी हे प्रयत्न चालवले आहेत. पाकिस्तानात हा प्रयोग सुरू आहे.

कोरोनासदृष विषाणू प्रयोगशाळेत तयार करण्याच्या चीनच्या प्रयत्नांना पायबंद घालणे गरजेचे असल्याचे मत सिंगापूर विद्यापीठाचे डॉ. रायन क्लार्क यांनी व्यक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने चीनच्या या प्रयत्नांना खीळ न घातल्यास हा प्रयोग घातक ठरू शकतो, असा इशाराही डॉ. क्लार्क यांनी दिला.

चीनची साथ देत असलेल्या पाकिस्तानलाही जागतिक स्तरावर एकटे पाडायला हवे, असा आग्रह ते धरतात. इतिहासाची पुनरावृत्ती होत असल्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. १९५३ साली चीनमध्ये भयंकर दुष्काळ पडला होता. त्यासाठी चिमण्यांना दोषी ठरविण्यात आले.

तत्कालीन अध्यक्ष माओ त्से तुंग यांनी झीरो स्पॅरो अभियान चालवले. अनेक चिमण्यांना मारण्यात आले. तेच धोरण विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग राबवू पहात आहेत. त्यांनी झीरो कोरोना धोरण जाहीर केले आहे. या धोरणांतर्गत चीनमधील पाळीव प्राण्यांची कत्तल केली जात आहे. कारण त्यांच्या माध्यमातून कोरोना फैलावतो असा समज आहे.

शनिवारी देशात कोविड-१९ विषाणूची बाधा झालेले २,५२७ नवे रुग्ण आढळून आले. त्याबरोबर देशातील एकूण बाधितांची संख्या ४,३०,५४,९५२ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही वाढून १५,०७९ झाली आहे. शनिवारी सकाळी ८.०० वाजेच्या आकडेवारीनुसार, देशात आणखी ३३ जण कोविड-१९ विषाणूमुळे मरण पावले आहेत.

त्याबरोबर मृतांची संख्या आता ५,२२,१४९ झाली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण एकूण बाधितांच्या तुलनेत ०.०४ टक्के आहे. मागील २४ तासांत सक्रिय रुग्णांच्या संख्येत ८,३८ जणांची भर पडली आहे. दैनंदिन बाधा दर (पॉझिटिव्हिटी रेट) ०.५६ टक्के, तर साप्ताहिक बाधा दर ०.५० टक्के इतका नोंदला गेला आहे.

आजारातून बरे झालेल्यांची संख्या आता ४,२५,१७,७२४ झाली आहे. कोविड-१९ रुग्णांचा बरे होण्याचा राष्ट्रीय दर ९८.७५ टक्के आहे. मृत्युदर १.२१ टक्के इतका आहे. दरम्यान, शनिवारपर्यंत देशात कोविड प्रतिबंधक लसीच्या १८७.४६ मात्रा देशभरात दिल्या गेल्या आहेत.

भारतासह जगभरात कोरोनाची तिसरी लाट येते आहे का, असा प्रश्न उपस्थित व्हावा, अशी परिस्थिती निर्माण होताना दिसते. डिसेंबर २०१९मध्ये चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा संसर्ग सर्वप्रथम झाला की, हा संसर्ग तयार करण्यात आला यावर वाद आहे; पण पाहता पाहता केवळ शंभर दिवसांत जगातील सर्वच देशांमध्ये तो पसरला.

कोरोनाचा संसर्ग किती वेगाने पसरतो आहे, याचा पहिल्याच लाटेत अनुभव आला आहे. आज पुन्हा एकदा चीन रडारवर आहे. शांघायसारखे महासत्तेचे आर्थिक राजधानीचे शहर पूर्णत: बंद करून जनतेला कोंडून ठेवावे लागले आहे.