CoronaVirus News: अमेरिका सोडा; 'या' देशातील कोरोना मृतांची 'संख्या' थरकाप उडवणारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 05:24 PM2020-06-01T17:24:16+5:302020-06-01T17:31:09+5:30

चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूनं जगभरात थैमान घातलं आहे. चीननं कोरोना संकट नियंत्रणात आणलं असलं, तरी अद्याप अनेक देशांना कोरोनावर नियंत्रण मिळवता आलेलं नाही.

भारतातही कोरोना बाधितांची संख्या सातत्यानं वाढत आहे. जगाचा विचार केल्यास भारत सध्या सातव्या स्थानावर आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या १ लाख ९० हजारांच्या पुढे आहे. तर मृतांचा आकडा साडे पाच हजारांच्या आसपास आहे.

जगातील सर्वात शक्तिशाली देश, सुपरवॉपर अशी बिरुदावली मिरवणारी अमेरिका कोरोनापुढे अक्षरश: हतबल झाली आहे.

अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा तब्बल १८ लाखांच्या पुढे गेला आहे. तर मृतांचा १ लाख ६ हजारांपेक्षा अधिक आहे.

भारत आणि अमेरिकेच्या लोकसंख्येची तुलना केल्यास भारतातील परिस्थिती सध्या तरी चांगली आहे.

कोरोनाबाधितांच्या आकडेवारीचा विचार केल्यास बेल्जियम १९ व्या क्रमांकावर आहे. या देशातील कोरोना रुग्णांची संख्या ५८ हजारांपेक्षा जास्त आहे.

बेल्जियममधील कोरोना मृतांचा आकडा साडे नऊ हजारांच्या आसपास पोहोचला आहे. बेल्जियमची लोकसंख्या केवळ १.१५ कोटी इतकी आहे.

बेल्जियमची लोकसंख्या आणि मृतांचा आकडा यांची तुलना केल्यास तिथल्या परिस्थितीचं गांभीर्य कळू शकेल.

मुंबईची लोकसंख्या पावणे दोन कोटीहून अधिक आहे. म्हणजेच बेल्जियमपेक्षा जास्त आहे. मात्र बेल्जियममध्ये कोरोनामुळे साडे नऊ हजार जणांचा बळी गेला असताना मुंबईतील कोरोना बळींचा आकडा १३०० च्या आसपास आहे.

अमेरिकेची लोकसंख्या ३३ कोटींच्या घरात आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेलाच बसला आहे. मात्र आकडेवारीची तुलना केल्यास बेल्जियमची अवस्था जास्त बिकट आहे.

३३ कोटी लोकसंख्या अमेरिकेत कोरोनामुळे १ लाख ६ हजार बळी गेले असताना सव्वा कोटीही लोकसंख्या नसलेल्या बेल्जियममधील मृतांचा आकडा साडे नऊ हजारांच्या आसपास पोहोचला आहे. यावरुन बेल्जियममधील परिस्थितीची कल्पना करता येऊ शकेल.