CoronaVirus News: कोरोना लस! महिलेला अज्ञात आजार; जॉन्सन अँड जॉन्सनने चाचणी थांबविली

By हेमंत बावकर | Published: October 13, 2020 09:12 AM2020-10-13T09:12:02+5:302020-10-13T10:21:43+5:30

Corona Virus Vaccine Trial: मोठ्या चाचण्यांमध्ये अशाप्रकारच्या घटना सुरु असतात. या ट्रायलमध्ये 10 हजारहून अधिक लोकांवर चाचणी घेतली जात होती.

कोरोना व्हॅक्सिन कधी येणार याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. कोणतेही एक व्हॅक्सिन जगाला तारणार नाहीय. एवढ्या मोठ्या लोकसंख्येला मोठ्या प्रमाणावर लसीची गरज आहे. यामुळे काही कंपन्यांची औषधे यशस्वी ठरावी लागणार आहेत.

सोमवारी कोरोना लसीच्या आशेला आणखी एक धक्का बसला आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने कोरोना लसीच्या चाचण्या थांबविल्या आहेत.

लसीची चाचणी घेणाऱ्या महिलेला अज्ञात आजाराचा सामना करावा लागल्याने कंपनीने त्यांच्या लसीची चाचणी तात्पुरती थांबविली आहे. याबाबत कंपनीने सोमवारी स्पष्ट केले आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनने सांगितले की, महिलेला झालेला आजार काय आहे याचा अभ्यास केला जात आहे. तिला निरिक्षणखाली ठेवण्यात आले असून एक स्वतंत्र डेटा तयार केला जात आहे.

मोठ्या चाचण्यांमध्ये अशाप्रकारच्या घटना सुरु असतात. या ट्रायलमध्ये 10 हजारहून अधिक लोकांवर चाचणी घेतली जात होती.

महिलेला अज्ञात आजार उद्भवल्याने चाचणीचा अभ्यास रोखण्यात आला आहे. रेग्युलेटरी बोर्डाकडून लावण्यात येणाऱ्या रोखीचा याच्याशी संबंध नाही.

जॉन्सन अँड जॉन्सनचे हे पाऊल अॅस्ट्राझिनेकाच्या लसीवेळी उचलण्यात आले होते, तसेच आहे. सप्टेंबरमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने देखील त्यांच्या लसीची चाचणी थांबविली होती.

ऑक्सफर्डच्या लसीच्या चाचणीवेळी एका महिलेला असाच आजार उद्भवला होता. मात्र, युके, ब्राझील, आफ्रिका आणि भारतात या लसीची चाचणी पुन्हा सुरु झाली होती. अमेरिकेमध्ये अद्याप ही चाचणी सुरु झालेली नाही.

वेंडरबिल्ट विद्यापीठाचे संक्रमण रोगांवरील प्राध्यापक डॉ. विलियम शेफ़नर यांनी ईमेल द्वारे सांगितले की, अॅस्ट्राझिनेकाच्या लसीसोबत जे झाले त्यामुळे प्रतियेकजन सावध आहे.

ही एक गंभीर घटना ठरू शकते. हे प्रोटेस्ट कॅन्सर, अनियंत्रित मधुमेह किंवा हृदयविकाराचा झटका सारखे काही असते तर या कारणामुळे ट्रायल थांबविली गेली नसती, असे ते म्हणाले.

दरम्यान, गेल्या महिन्यातच जॉन्सन अँड जॉन्सनने जाहीर केले होते की, कोरोनाविरोधात त्यांची लस इम्यून सिस्टम वाढविण्यात यशस्वी ठरत आहे.

यानंतर कंपनीने 60000 लोकांवर लसीची मानवी चाचणी घेतली. या चाचणीचे निकाल या वर्षाच्या शेवटी किंवा 2021 च्या सुरुवातीला येण्याची शक्यता आहे.