भारताविरोधात चीनचा नवा डाव, नेपाळला मोहरा बनवून 'या' प्रकल्पाच्या कामाला केली सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 11:36 AM2020-08-02T11:36:40+5:302020-08-02T17:49:39+5:30

लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) भारत आणि चिनी सैन्यांत अजूनही काही तणाव आहे, ज्याचा परिणाम दोन्ही देशांमधील संबंधांवरही होत आहे. अशा परिस्थितीत भारताला दबावाखाली आणण्यासाठी चीनने ल्हासा ते नेपाळमधील काठमांडूपर्यंत 2250 कोटी रुपये खर्चून रेल्वे मार्ग तयार करण्याची तयारी सुरू केली आहे.

हा रेल्वे मार्ग पुढे भारत-नेपाळ सीमेजवळील लुंबिनीशीला जोडला जाईल. चीनची ही विकास रणनीती आहे. हा करार अनेक वर्षांपासून थंड बस्त्यात पडून होता. परंतु ज्यावेळी एलएसीवर चीन आणि भारत यांच्यात तणाव वाढला, त्यानंतर चीनने वर्षानुवर्षे बंद पडलेला हा प्रकल्प तातडीने सुरु केला आहे. चिनी टीम आता तिबेट ते काठमांडू या रेल्वे प्रकल्पाच्या कामात व्यस्त आहे. चिनी माध्यमांमध्ये या प्रकल्पाचे फोटो ट्रेंड करत आहेत.

नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांचे चीनशी असलेले संबंध जगजाहीर आहेत. चीनने ओलीची खुर्ची वाचवली आहे आणि त्या बदल्यात ओली चीनच्या इशाऱ्यावर निर्णय घेत आहेत. नेपाळीमध्ये भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी ओली प्रयत्नशील आहेत. सीमेवरील तणावाच्या वातावरणात चीनने नेपाळपर्यंत रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू केले आहे.

ल्हासाला काठमांडूला जोडण्यासाठी चीनने दशकाच्या जुन्या रेल्वे प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. हा रेल्वे मार्ग शिगात्सेमार्गे तिबेटच्या ल्हासा ते केरुंग येथे पोहोचेल आणि त्यानंतर रसवा गांधीमार्गे नेपाळमध्ये प्रवेश करून काठमांडूपर्यंत जाईल. ल्हासा ते शिगात्सेपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. तर शिगात्से ते केरुंगपर्यंतचे काम सुरू झाले आहे. तसेच, या प्रकल्पासाठी नेपाळच्या भागात चीन सर्वेक्षण करण्याचे काम करत आहे.

चिनी माध्यमांनी या रेल्वे प्रकल्पाच्या सर्वेक्षणाचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. फोटोंमध्ये एक टीम कॉरिडोर साइटची पाहणी करताना दिसत आहे. दरम्यान, नेपाळ आणि भारत यांच्यात सीमेवरील तणाव सुरू असताना चीन आपल्या प्रकल्पांद्वारे नेपाळमधील आपली पकड आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे.

या रेल्वे मार्गासाठी चीन 300 मिलियन डॉलर म्हणजेच 2250 कोटी रुपये खर्च करणार असून चीनला काठमांडूला जोडणाऱ्या या रेल्वे मार्गासाठी अनेक पूल व बोगदे बांधले जातील.

यापूर्वीच तिबेट ते काठमांडू या मार्गावरील रेल्वे मार्ग भारताच्या दृष्टीकोनातून चुकीचा होता, पण आता चीन आणि नेपाळ या रेल्वेमार्गाच्या विस्तारासाठी चर्चेत असल्याचे वृत्त आहे. जो प्रस्ताव ठेवला आहे, त्यानुसार, ल्हासा-काठमांडू रेल्वे मार्ग आता भारताच्या सीमेवर असलेल्या भगवान बुद्धांचे जन्मस्थान लुंबिनीपर्यंत वाढविण्याचा विचार केला जात आहे.

यामुळे दोन धोके निर्माण होऊ शकतात. पहिला धोका सामरिक धोका आहे तर दुसरा धोका आर्थिक आहे. चीनच्या वस्तू भारताच्या सीमेपर्यंत सहज पोहोचतील आणि त्याला नवा लूक देऊन त्या भारतात आणल्या जाऊ शकतात.

या महत्वाकांक्षी प्रकल्पाची अंतिम मुदत 2025 आहे. मात्र आता नेपाळमध्ये रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षण सुरू आहे, पण, भारत सुद्धा चीनला रणनीतिकरित्या प्रतिसाद देण्याच्या योजनेवरही काम करत आहे. नेपाळमधील चीनचा प्रभाव रोखण्यासाठी भारताने रेल्वे कॉरिडोरचा प्रस्तावही ठेवला आहे.

भारत आणि नेपाळदरम्यान 6 रेल्वे मार्ग बांधण्याची योजना आहे. जयनगर-जनकपूर-बर्डीबास रेल्वे मार्गाची किंमत 5.5 अब्ज रुपये आहे. काठमांडू-रक्सौल रेल्वे मार्ग 136 किमी लांबीचा आहे. भारतीय टीमने यापूर्वी हा प्रकल्प करण्यासाठी अभ्यास केला आहे.

या प्रकल्पांच्या स्थितीविषयी बोलताना रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. यादव म्हणाले, आम्ही आमच्या सर्व पायाभूत सुविधांचे प्रकल्प शीर्षस्थानी ठेवले आहेत. मात्र, अलीकडील प्रकल्पाची टाइमलाइन आणि डिटेल्स नंतर दिला जाईल.