म्यानमारसारखा विनाशकारी भूकंप चीनलाही हादरवू शकतो? जमिनीखाली मोठ्या हालचाली, भारतालाही धोका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 16:46 IST2025-04-07T16:41:28+5:302025-04-07T16:46:47+5:30

म्यानमारसारखं भारताच्या आणखी एक शेजारील राष्ट्र चीनमध्ये शक्तिशाली भूकंपाने हाहाकार माजू शकतो. चीनच्या भूकंप वैज्ञानिकांच्या टीमने तीव्र भूकंपाच्या मालिकेचा इशारा दिला आहे. एका अभ्यासात चीनी वैज्ञानिकांनी पृथ्वीच्या परिभ्रमणातील चढउतारांशी भूकंपचक्रांना जोडणारे नमुने ओळखले आहेत.
हा अभ्यास म्यानमारमध्ये आलेल्या ७.९ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपापूर्वी प्रकाशित करण्यात आला होता. नवीन खुलाशांनंतर, पृथ्वीच्या टेक्टोनिक प्लेटमधील ताण धोकादायक टप्प्यात प्रवेश करत आहे का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
बीजिंग भूकंप विज्ञान संस्थेचे वरिष्ठ इंजिनिअर झू होंगबिन यांच्या नेतृत्वात १५० वर्षाहून अधिक भूकंपीय डेटाचे निरीक्षण केले जात आहे. त्यांनी चीन आणि आसपासच्या भागातील ६ प्रमुख भूकंप सक्रीय हालचाली ओळखल्या आहेत.
साऊथ चायना पोस्टनुसार, झू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तणाव क्षेत्र आता ईशान्येकडे सरकू शकतो अशी भीती व्यक्त केली आहे. हा प्रदेश सध्या भूकंपाच्या सक्रिय कालावधीच्या नवजात टप्प्यात प्रवेश करत आहे असं शास्त्रज्ञांनी एका निवेदनात म्हटले आहे.
नैऋत्य चीनमधील लाँगमेनशान फॉल्टच्या बंद भागांमध्ये वाढत्या दाबाकडे या अभ्यासात लक्ष वेधण्यात आले आहे. २००८ मध्ये सिचुआनमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाला कारणीभूत ठरलेला हाच फॉल्ट आहे. हे पूर्व हिमालयीन सिंटॅक्टिकवर देखील प्रकाश टाकते, जिथे जीपीएस डेटानुसार हा दाब भारताच्या उत्तर दिशेकडे सरकत आहे.
भूकंपाचा प्रत्येक कालखंड पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीतील बदलाशी — ज्याला दिवसाच्या लांबीतील (LOD) बदलांद्वारे मोजले जाते, आणि अशाच प्रकारच्या टेक्टोनिक ताणाच्या पुनर्संरेखनाशी संबंधित असतो हे झू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शोधून काढले.
म्यानमारमधील भूकंप पृथ्वीच्या फिरण्याच्या एका संक्रमणकालीन टप्प्यात (LOD) झाला होता. त्या काळात तो उत्तर-पूर्व दिशेने वाढलेल्या टेक्टोनिक दाबामुळे आधीच उच्च धोका असलेल्या भागांपैकी एक म्हणून ओळखला जात होता.
म्यानमारमध्ये भूकंपामुळे झालेली हानी - म्यानमारमध्ये २८ मार्च रोजी ७.७ तीव्रतेचा विनाशकारी भूकंप झाला होता, ज्यामध्ये ३००० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि हजारो लोक जखमी व बेघर झाले आहेत.
भारताने या भूकंपानंतर 'ऑपरेशन ब्रह्मा' या मदत मोहिमेची सुरुवात केली, जी अजूनही सुरू आहे. ६ एप्रिल रोजी भारतीय नौदलाचे एक जहाज तांदळाचा साठा घेऊन म्यानमारमधील यांगून शहरात पोहोचले होते.