China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 17:04 IST2025-11-28T16:44:24+5:302025-11-28T17:04:57+5:30

China Japan Taiwan: जपानच्या पंतप्रधान सनाई तकाइची यांनी तैवानबद्दल बोलताना चीनला इशारा देणारे एक विधान केले होते. याच विधानानंतर चीन आणि जपान यांच्यात तणाव वाढला आहे.

जपानच्या पंतप्रधान सनाई तकाइची यांनी ७ नोव्हेंबर रोजी केलेले विधान मागे घ्यावी, अशी भूमिका चीनने घेतली आहे. पंतप्रधान तकाइची यांनी केलेल्या विधानामुळेच दोन्ही देशातील संबंध ताणले गेले आहेत. चीनने आपल्या नागरिकांना जपानमध्ये न जाण्याचाही इशारा दिला आहे.

जपानच्या पंतप्रधान तकाइची असं काय बोलल्या होत्या की, दोन्ही देशातील वाद इतका वाढला आहे. हा वाद संयुक्त राष्ट्र संघापर्यंत पोहोचला आहे. ७ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान सनाई तकाइची यांनी म्हटले होते की, चीनने तैवानवर ताबा मिळवण्यासाठी लढाई सुरू केली, ते जपानच्या अस्तित्वाला धोका असेल.

संसदीय बैठकीमध्ये विरोधी पक्षाच्या खासदाराने तकाइची यांना विचारले होते की, तैवानशी संबंधित कोणती परिस्थिती जपानच्या अस्तित्वाला धोका आहे, असे मानले जाईल. त्यावर त्या म्हणाल्या की, "जर युद्धनोका आणि सैन्य बळाचा वापर झाला, मग तो कोणत्याही प्रकारे असो, तो जपानच्या अस्तित्वासाठी धोकादायकच असेल."

२०१५ मध्ये जपानच्या सुरक्षा कायद्यामध्ये अस्तित्वाला धोका असे संज्ञा समाविष्ट करण्यात आली. ज्याचा अर्थ शेजारी राष्ट्रावर हल्ला झाला, तर तो जपानच्या अस्तित्वाला धोका निर्माण करू शकतो आणि अशा स्थिती जपान आपली लष्करी शक्ती तैनात करू शकते.

तकाइची यांनी केलेल्या विधानाचे लागलीच पडसाद उमटले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे गंभीर विधान असल्याचे म्हणत ते मागे घेण्याची मागणी केली. चीनचे जपानमधील राजदूत श्वे चियान यांनीही सोशल मीडियावर तकाइची यांच्या विधानाची बातमी शेअर करत खूपच चुकीचे विधान असे म्हणत विरोध केला. नंतर त्यांनी ही पोस्ट डिलिट केली. पण, चीन अजूनही ते विधान मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहे.