अशी आहे चीनमध्ये तयार केलेली कोरोनावरील लस, पहिल्यांदाच जगासमोर आणली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 18:39 IST2020-09-07T18:28:04+5:302020-09-07T18:39:36+5:30

पहिल्यांदाच चीनने आपल्या देशात तयार केलेली कोरोनावरील लस ट्रेड फेअरमध्ये आणली आहे. सिनोव्हाक बायोटेक आणि सिनोफर्म या चिनी कंपनीने तयार केलेली लस सोमवारी बीजिंगमध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आली. आतापर्यंत दोन्ही लसी बाजारात आल्या नाहीत.

सिनोव्हाक बायोटेक आणि सिनोफर्म यांनी तयार केलेल्या लसींची फेज-3 ट्रायल सध्या बर्‍याच देशांमध्ये सुरू आहे. काही अहवालात असेही म्हटले आहे की, चीनमध्ये काही लोकांना यापूर्वी लसीचा डोस देण्यात आला आहे.

सिनोव्हाक कंपनीच्या अधिकाऱ्यांने 'एएफपी'ला सांगितले की, 'कंपनीने या कारखान्याचे बांधकाम आधीच पूर्ण केले आहे, जे एका वर्षात लसीचे ३० कोटी डोस तयार करण्यास सक्षम आहे.'

बीजिंगमध्ये आयोजित ट्रेड फेअरमध्ये लस पाहण्यासाठी बसेच लोक जमले होते. दरम्यान, कोरोना विषाणूमुळे चीनला विविध देशांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे.

मात्र, आता चीन आपली प्रतिमा बदलण्यासाठी प्रयत्न करत आहे. मे महिन्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही म्हटले होते की, चीनमध्ये तयार केलेली कोरोना लस ही लोकांच्या हिताची ठरेल.

सिनोफर्म कंपनीने म्हटले आहे की, त्याच्या कोरोना लसीपासून तयार झालेले अँटिबॉडीज् व्यक्तीच्या शरीरात एक ते तीन वर्षे टिकू शकतात. लसीचा अंतिम निकाल येणे बाकी आहे. गेल्या महिन्यात चीनच्या वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने म्हटले होते की लसीचे दर जास्त होणार नाहीत.

दरम्यान, कोरोनामुळे जगभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल ४२ लाखांचा टप्पा पार केला आहे.

गेल्या २४ तासांत भारतातील कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून ब्राझीलला मागे टाकत कोरोनाग्रस्त देशांच्या आकडेवारीत भारत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९०, ८०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १,०१६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४२,०४,६१४ वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ७१,६४२ वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.