चीनने विकसित केलं महाशक्तिशाली जेट इंजिन, अवघ्या दोन तासांत पोहोचू शकते जगात कुठेही

By बाळकृष्ण परब | Published: December 2, 2020 04:09 PM2020-12-02T16:09:26+5:302020-12-02T16:17:09+5:30

China News : चीनने एक असे हायपरसॉनिक जेट इंजिन तयार केल्याचा दावा केला आहे जे ध्वनीपेक्षा १६ पट अधिक वेगवान आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात दिवसागणिक नवनवे टप्पे गाठणाऱ्या चीनने अजून एक कमाल केली आहे. चीनने एक असे हायपरसॉनिक जेट इंजिन तयार केल्याचा दावा केला आहे जे ध्वनीपेक्षा १६ पट अधिक वेगवान आहे.

करण्यात आलेल्या दाव्यानुसार जर हे जेट इंजिन कुठल्याही विमानामध्ये फिट केल्यास जगातील कुठल्याही भागात दोन तासांत पोहोचू शकते. ध्वनीचा वेग हा १२३४ किमी प्रतितास एवढा असतो. तर हे विमान त्यापेक्षा १६ पट अधिक वेगाने उड्डाण करू शकते.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार चीनने नव्या जेट इंजिनाला Sodramjet असे नाव दिले आहे. बीजिंगमधील एका बोगद्यात त्याची चाचणी घेण्यात आली. या चाचणी वेळी या जेट इंजिनाने बोगद्यात कमाल वेगमर्यादा गाठली.

तज्ज्ञांच्या मते पारंपरिक धावपट्ट्यांवरून उ़ड्डाण करणाऱ्या विमानांमध्येसुद्धा हे इंजिन लावता येऊ शकेल. उड्डान केल्यानंतर हे विमान एका खास ऑर्बिटमध्ये पोहोचेल आणि लाँडिंग करताना ते पृथ्वीच्या वातावरणात येईल.

आता हे इंजिन पुढील परीक्षणांमध्येही यशस्वी ठरले आणि लष्करानेसुद्धा त्याचा वापर केला तर हे इंजिन एक धोकादायक हत्यार ठरणार आहे. तर साऊथ चायना मॉर्निंग पोस्टला एका तज्ज्ञाने सांगितले की, नव्या इंजिनाबाबतचे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. मात्र हे संशोधन प्रकाशित करताना या तंत्रज्ञानामागचे गुपित सार्वजनिक होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

संशोधकांच्या मते नव्या तंत्रज्ञानाचे परीक्षणसुद्धा तज्ज्ञांनी केले आहे. या इंजिनामध्ये इंधन म्हणून हायड्रोजनचा वापर करण्यात आला आहे. चायनिज अॅकॅडमी ऑफ सायन्सचे प्राध्यापक जिआंग जोंगलिन यांनी हे इंजिन तयार करण्याऱ्या तज्ज्ञांच्या पथकाचे नेतृत्व केले होते.