भारतच नाही एकूण २३ देशांच्या भूमीवर दावा, असे आहे चीनचे विस्तारवादी धोरण....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 16:55 IST2020-06-20T16:22:11+5:302020-06-20T16:55:03+5:30

लडाखमधील गलवान खोऱ्यात निर्माण झालेल्या तणावामुळे सध्या भारत आणि चीनमधील सीमाप्रश्न ऐरणीवर आलेला आहे. मात्र केवळ भारतच नाही तर चीनच्या शेजारी असलेले सर्व देश आणि आजूबाजूच्या एकूण २३ देशांच्या भूभागांवर आपला दावा ठोकला आहे. चीनच्या या विस्तारवादी भूमिकेमुळे चीनच्या आजूबाजूला असलेले २३ देश त्रस्त आहेत.

ब्रुनेई, कंबोडिया आणि इंडोनेशियावर दावा
दक्षिण चीन समुद्र हा चीनच्या अरेरावीमुळे वादाचे केंद्र बनलेला आहे. येथील काही भागांवर ब्रुनेईचा ताबा आहे. मात्र चीनला हे मान्य नाही. काही ऐतिहासिक संदर्भ देत चीन कंबोडियावरही आपला दावा करत असतो. तर दक्षिण चीन समुद्रातील काही भागांवर इडोनेशियाचा असलेला अधिकारही चीनला मान्य नाही.

इतर देशांसोबतही सीमेवरून विवाद
चीन आणि रशियामध्ये लांबलचक सीमारेषा आहे. मात्र या सीमेवरील बऱ्याच मोठ्या भूभागावर चीनने आपला दावा ठोकलेला आहे. दोन्ही देशांमध्ये अनेक करार-मदार झाल्यानंतरही त्यावर तोडगा निघालेला नाही. तैवानला चीनचा प्रांत मानले जाते. मात्र तैवानचा याला विरोध आहे. सिंगापूरसोबतसुद्धा दक्षिण चीन समुद्रातील मालकीवरून चीनचा वाद सुरू आहे.

पाकिस्तानसोबतही सुरू आहे सीमावाद
भारतविरोध या समान धाग्यावर पाकिस्तान आणि चीन यांच्यातील मैत्री दृढ झालेली आहे. मात्र या देशांमध्येसुद्धा सीमेवरून काही प्रमाणात वाज सुरू आहे. सध्या चीन पाकिस्तानमध्ये इकॉनॉमिक कॉरिडॉर बांधत आहे. ही बाब पुढच्या काळात पाकिस्तानसाठी नुकसानकारक ठरणारी आहे. तसेच चीनचा हा हेतू साध्य झाला तर चीन पाकिस्तानच्या मोठ्या भागावर कब्जा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

व्हिएतनाम आणि चीनमधील विवाद
ऐतिहासिक संदर्भ दाखवून त्या भागावर हक्क सांगण्यात चीनचा हात कुणीच धरू शकत नाही. १३६८ ते १६४४ या काळात मिंग राजवटीची सत्ता असल्याने चीन व्हिएतनामवरसुद्धा आपला दावा सांगतो. यावरून चीन आणि व्हिएतनाम यांच्यात युद्धही झाले आहे.

चीन आणि म्यानमार सीमावाद
इस १२७१ ते १३६८ या काळात चीनच्या युआन राजवांशाच्या कार्यकाळात म्यानमार हा चीनचा भाग होता. त्या इतिहासाला आधार मानून चीन बर्माच्या मोठ्या भूभागावर आपला दावा सांगतो.

चीन आणि नेपाळ सीमावाद
गेल्या काही वर्षांत नेपाळ हा भारतापासून दुरावून चीनच्या अगदी जवळ गेला आहे. चीनच्या सांगण्यावरून नेपाळ भारताला सातत्याने डिवचत आहे. मात्र खुद्द नेपाळच्याच बऱ्याच मोठ्या भागावर चीनने दावेदारी ठोकलेली आहे. १७८८ ते १७९२ या दरम्यान, झालेल्या युद्धापासून चीन ही दावेदारी करत आहे. नेपाळ हा तिबेटचाच भाग आहे, त्यामुळे त्यावर चीनचा हक्क आहे, असा चीनचा दावा आहे.

भारत आणि चीन सीमावाद
भारत आणि चीनदरम्यानही दीर्घकाळापासून सीमाविवाद सुरू आहे. भारताच्या लडाख आणि अरुणाचलमधील मोठ्या भागावर चीन दावा करत आला आहे. त्यावरून दोन्ही देशांमध्ये १९६२ मध्ये युद्धही झाले होते. हल्लीच गलाव खोऱ्यात झालेला संघर्ष हा सुद्धा चीनच्या विस्तारवादी धोरणाचाच भाग आहे.

अफगाणिस्तानसोबत सीमावाद
चीनचा सीमेवरून वाद असलेल्या देशांमध्ये अफगाणिस्तानचाही समावेश आहे. १९६३ मध्ये झालेल्या करारानंतरही चीनकडून अफगाणिस्तानमधील मोठ्या भूभागावर दावा करण्यात येत आहे.

किर्गिस्तानसोबतचा सीमावाद
किर्गिस्तानच्या मोठ्या भूभागावर आपला अधिकार आहे, असा दावा चीनकडून करण्यात येतो. १९ व्या शतकात हा भूभाग आपण जिंकला होता, असा चीनचा दावा आहे. त्याबरोबरच कझाकिस्तानसोबतही चीनचा सीमावाद सुरू आहे. हल्लीच त्यावरून दोन्ही देशाममध्ये करार झाले असून, हे करार चीनला अनुकूल असे आहेत.

दक्षिण कोरियासोबतचा सीमावाद
चीनच्या विस्तारवादी धोरणाची झळ बसलेल्या देशांमध्ये दक्षिण कोरियाचाही समावेश आहे. पूर्व चीन समुद्रातील अनेक भूभागांवर दक्षिण कोरियाचा कब्जा आहे. मात्र संपूर्ण दक्षिण कोरियावरच आपला हक्क आहे, असे चीनकडून सांगण्यात येते. त्यासाठी युआन राजवटीतील सत्तेचा दाखला दिला जातो. तसेच उत्तर कोरियातील जिन्दाओ भागावरही चीनने दावेदारी केलेली आहे.

भूतानच्या मोठ्या भूभागावर दावा
चार वर्षांपूर्वी झालेल्या डोकलाम विवादाबाबत सर्वांनाच माहित असेल. दरम्यान, चीनने भूतान या देशाच्या बऱ्याच मोठ्या भूभागावर आपला दावा केलेला आहे. येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर चीनने बंकरही उभारलेले आहेत. सद्यस्थितीत भारत आणि भूतान यांच्यात चांगले संबंध असून, भारत भूतानला वेळोवेळी मदतही करत असतो.

तजाकिस्तानवरील दावा
चीनच्या म्हणण्यानुसार तजाकिस्तानवर चीनच्या किंग राजवंशाची १६४४ ते १९१२ या काळात सत्ता होती. त्यामुळे तजाकिस्तानवर आपला हक्क आहे. चीनकडून या भागात वारंवार कुरापतीही काढल्या जातात.

















