चीन चवताळला! दक्षिण समुद्रात घुसलेल्या अमेरिकेला दिले चोख प्रत्यूत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 02:50 PM2020-07-18T14:50:14+5:302020-07-18T14:58:39+5:30

अमेरिकेच्या या पावलामुळे तणावात आलेल्या चीनने युद्धाभ्यासातून काही कुमक काढून घेत कृत्रिम बेटांवर तैनात केली आहे. या चीनच्या पावलामुळे पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे.

दक्षिण चीन समुद्रामध्ये अमेरिका आणि चीनमध्ये तणाव वाढू लागला आहे. या समुद्रातील वादग्रस्त भागामध्ये चीनकडून 70 दिवसांचा युद्धाभ्यास सुरु आहे. याविरोधात अमेरिकेने दोन मोठ्या विमानवाहू युद्धनौका आणि मोठ्या संख्येने लढाऊ विमाने तैनात केली आहेत.

अमेरिकेच्या या पावलामुळे तणावात आलेल्या चीनने युद्धाभ्यासातून काही कुमक काढून घेत कृत्रिम बेटांवर तैनात केली आहे. या चीनच्या पावलामुळे पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे.

सॅटेलाईटद्वारे घेतल्या गेलेल्या या फोटोंतून दक्षिण चीन समुद्रात वादग्रस्त बेटांवर चीनने 8 लढाऊ विमाने तैनात केल्याचे दिसत आहे. यामध्ये 4 जे 11 बीएस आणि बाकीची बॉम्बवर्षाव करणारी विमाने आहेत.

अमेरिकेच्या युद्धनौकांवर हल्ला करण्यासाठी ही लढाऊ विमाने सक्षम आहेत. वुडी बेटांवर ही विमाने तैनात करण्यात आली आहेत.

वुडी बेटांवर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर लढाऊ विमाने तैनात करण्यात आल्याचे संरक्षण क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.

वुडी बेटांवर चीनचा परासेल बेटांनंतरचा सर्वात मोठा लष्करी तळ आहे. हा भाग चीन, व्हिएतनाम आणि तैवानला जोडलेला आहे. अमेरिकेच्या पावलानंतर चीन या भागात मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि शस्त्रास्त्रे तैनात करू लागला आहे.

या वादग्रस्त समुद्रामध्ये चीनचा 31 जुलैपर्यंत युद्धसराव सुरु आहे. तैवानवर हल्ला करण्यासाठी हा सराव करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. तर याला प्रत्यूत्तर म्हणून अमेरिकेने 4 ते 10 जुलै असा युद्धसराव केला होता.

दक्षिण चीन समुद्रामध्ये अमेरिकेने युद्धाभ्यास सुरु केला होता. याचबरोबर अमेरिकन नौदलाने फुत्कारणाऱ्या चीनला जशासतसे प्रत्यूत्तर दिले आहे. चीनच्या धमकीनंतरही अमेरिकेच्या 11 लढाऊ विमानांनी दक्षिण चीन समुद्राच्या वादग्रस्त भागावर उड्डाण केले. ही विमाने चीनचे सैनिक केवळ पाहतच राहिले.

अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी उड्डाण केल्यानंतर चीनच्या सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने शक्तीचे खुले प्रदर्शन केले अशी टीका केली होती. रविवारी ग्लोबल टाईम्सने अमेरिकेला इशारा दिला होता. चीनच्या समुद्रात आलात तर याद राखा, असा इशारा ग्लोबल टाईम्सने ट्विट करून दिला होता. यामध्ये चीनची क्षेपणास्त्रे आणि युद्धनौकांचा फोटो वापरण्यात आला होता. यावर अमेरिकेच्या सैन्याने मजेशीर ट्विट करत तरीही आम्ही इथेच आहोत आणि राहणार असे ट्विट करत आव्हान दिले होते.

यानंतर अमेरिकेने आक्रमक होत चीन दावा करत असलेल्या समुद्रावर घिरट्या घातल्या. अमेरिकी नौदलाच्या ताफ्यात अणुबॉम्ब वाहून नेऊ शकणारी विमाने आहेत. ही विमाने असलेल्या दोन युद्धनौका अमेरिकेने चीनच्या समुद्रात तैनात केल्या आहेत