उद्योगपती Jack Ma यांनी 'या' देशात घेतला आश्रय; सरकारविरोधात बोलल्याची मिळाली मोठी शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 06:33 PM2022-11-30T18:33:21+5:302022-11-30T18:37:22+5:30

Jack Ma चीनी टेक्नोलॉजी सेक्टरचे पोस्टर बॉय होते. पण, सरकारविरोधात बोलल्याची त्यांना मोठी किंमत मोजावी लागली.

दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अलीबाबा (Alibaba Group) चे को-फाउंडर जॅक मा (Jack Ma) आणि चीन सरकारमध्ये वाद सुरू आहे. यातच 2021 मध्ये अचानक त्यांच्या गायब झाल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर सर्वजण चकीत झाले. जॅक मा कुठे आहेत, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. आता जॅक मा चीन सोडून टोकियो (Tokyo) मध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जॅक गेल्या 6 महीन्यांपासून टोकियोमध्ये राहत आहेत. तिथे त्यांनी स्वतःला खूप लो प्रोफाइलमध्ये ठेवले आहे. जॅक मा आपल्यासोबत स्वतःचे खासगी सुरक्षा रक्षक आणि आणि शेफ घेऊन गेले आहेत. जॅक मा यांच्या जवळच्या व्यक्तींनी मीडियाला सांगितल्यानुसार, जॅक मा सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळतात. जापानमधील वास्तव्यादरम्यान, जॅक मा आपल्या कुटुंबासोबत गरम पाण्याच्या झरणे आणि स्‍की रिसॉर्टला गेले आहेत. पण, याची माहिती फार कमी लोकांना आहे.

ऑक्टोबर 2020 मध्ये चीन सरकारवर केलेल्या टीकेनंतर जॅक मा निशाण्यावर आले होते. 24 ऑक्टोबर 2020ला एक मीटिंग झाली होती, ज्यात चीनची अर्थव्यवस्था आणि राजकारणातील दिग्गज सामील झाले होते. या बैठकीत जॅक मा यांनी चीनी बँकांवर टीका केली होती. फंडिंग उपलब्ध करुन देण्यासाठी बँका गहाण ठेवण्यास सांगतात, यामुळे नवीन टेक्नोलॉजीला फंड मिळू शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.

वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये छापून आलेल्या रिपोर्टनुसार, जेव्हा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग (Xi Jinping) यांना जॅक मा यांच्या वक्तव्याची माहिती लागली, तेव्हा ते नाराज झाले आणि तेव्हापासून जॅक मा सार्वजनिक ठिकाणी दिसणे बंद झाले. बँकांवरील टीकेनंतर जॅक मा आणि चीनी सरकारमध्ये वाद सुरू झाला.

चीन सरकार जॅक मांविरोधात इथेच थांबली नाही, तर सरकारने मा यांची कंपनी अँट ग्रुपचा IPO रोखला. याची व्याप्ती 37 बिलियन डॉलर्सची होती. तसेच, कंपनीवर 2.8 बिलियन डॉलर्सचा अँटी ट्रस्ट फाइन लावला. या संपूर्ण प्रकरणानंतर जॅक मा अचानक गायब झाले. मध्ये काही उलट-सूलट चर्चाही सुरू झाल्या होत्या.

दरम्यान, 2021 मध्ये त्यांचा एक व्हिडिओ समोर आला होता, पण नंतर त्यांची संपत्ती झपाट्याने कमी होत गेली. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, नोव्हेंबर 2020 मध्ये जॅक मा यांची नेटवर्थ 4.9 लाख कोटी रुपये होती. नोव्हेंबर 2021 मध्ये कमी होऊन 3.5 लाख कोटी आणि नोव्हेबंर 2022 मध्ये 2.4 लाख कोटी झाली आहे.

जॅक मा चीनी टेक्नोलॉजी सेक्टरचे पोस्टर बॉय होते. संपूर्ण जगात त्यांची लोकप्रियता होती. पण, चीनी सरकारविरोधात केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांना मोठा फटका बसला. आता त्यांनी दुसऱ्या देशात आश्रय घेतला असून, एकांतातील जीवन जगत आहेत. सरकारविरोधात बोलल्याची त्यांना मोठी किंमत मोजावी लागली.