'...तर तो आपल्या सर्वांचा अंत असेल, अन् युक्रेन काय संपूर्ण युरोपचा शेवट होईल'; झेलेन्स्कींचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 02:51 PM2022-03-04T14:51:33+5:302022-03-04T15:18:45+5:30

रशियन सैन्याने युक्रेनमधील अणुऊर्जा केंद्रावर गोळीबार केल्यानंतर अमेरिका, ब्रिटन वगैरे देशही या बाबतीत लगेच सक्रिय झाले.

रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध दिवसागणित भीषण होत चालले आहे. रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध सुरू होऊन आठवडा उलटला आहे. या युद्धामध्ये दोन्हीकडून मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होत आहे.

दरम्यान दोन्ही देशांमध्ये शांततेसाठी चर्चा सुरु आहे. दोन्ही देशांचे अधिकारी या संकटावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करत आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्या चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या आहे. परंतु अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. आता तिसऱ्या फेरीची चर्चा लवकरच होण्याची अपेक्षा आहे.

रशियन सैन्याने युक्रेनमधील युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा केंद्रावर गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकल्प एनरहोदर येथे आहे, नीपर नदीवरील शहर आहे जे देशाच्या वीज निर्मितीच्या एक चतुर्थांश भाग आहे. प्लांटच्या प्रवक्त्याने सांगितले की गोळीबार शुक्रवारी पहाटे सुरू झाला.

रशियन सैन्याने गुरुवारी युरोपमधील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या युक्रेनियन शहराच्या नियंत्रणासाठी लढा दिला आणि युक्रेनियन नेत्यांनी नागरिकांना गनिमी युद्ध पुकारण्याचे आवाहन केलं आहे.

रशियन सैन्याने युक्रेनमधील अणुऊर्जा केंद्रावर गोळीबार केल्यानंतर अमेरिका, ब्रिटन वगैरे देशही या बाबतीत लगेच सक्रिय झाले. तसेच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना इशारा दिला आहे. अणुऊर्जा केंद्राचा विस्फोट झाल्यानंतर पूर्ण युरोपचा अंत होईल.

वोलोडिमीर झेलेन्स्की म्हणाले की, युक्रेनमध्ये एकूण १५ अणुऊर्जा केंद्र आहेत. जर कोणत्याही अणुऊर्जा केंद्र स्फोट झाला, तर तो आपल्या सर्वांचा अंत असेल. हा युरोपचा शेवट असेल. संपूर्ण युरोप रिकामा होईल, असं वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलं.

दरम्यान, रशियन सैन्यानं एनरहोदर शहरावर हल्ला केला. हे शहर झापोरिझ्झिया पासून अवघ्या काही अंतरावर आहे. झापोरिझ्झिया अणुऊर्जा प्रकल्पात ६ रिअॅक्टर्स आहेत. हे युरोपमधील सर्वात मोठे, तर पृथ्वीवरील नववे सर्वात मोठे रिअॅक्टर आहेत.

सध्या रशिया या ठिकाणी मोर्टार आणि आरपीजीतून हल्ला करत आहे. अणुऊर्जा केंद्राच्या काही भागांमध्ये सध्या आग लागली असून रशियानं अग्निशमन दलाच्या गाड्यांवरही गोळीबार केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं आहे.