नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 10:55 IST2025-10-11T10:42:06+5:302025-10-11T10:55:46+5:30

Donald Trump Impose 100 Percent Tariff On China Products: नोबेल पुरस्कार हुकल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता चीनवर पडली आहे. यानंतर अमेरिका-चीनमधील टॅरिफ ट्रेड तणाव वाढवण्याची चिन्हे असल्याचे म्हटले जात आहे.

Donald Trump Impose 100 Percent Tariff On China Products: गेल्या काही महिन्यांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर टॅरिफ लादण्यास सुरुवात केली आहे. याचे पडसाद जगभरातील बाजारात उमटत असल्याचे दिसत आहेत. यामुळे अनेक देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. नोबेल पुरस्कार हुकल्यानंतर ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता चीनवर पडली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी चीनविरुद्ध नवीन व्यापारी योजनांची घोषणा केली. १ नोव्हेंबरपासून चीनमधून आयात केलेल्या सर्व वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त कर लादले. तसेच अमेरिकेत उत्पादित होणाऱ्या आणि निर्यात केल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या सॉफ्टवेअरवर नियंत्रण मिळवण्याचा मानस ट्रम्प यांनी बोलून दाखवला. यामुळे जगातील दोन सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये तणाव वाढू शकतो, असे म्हटले जात आहे.

सोशल मीडिया पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर व्यापाराबाबत अति आक्रमक भूमिका अवलंबली असल्याचा आरोप केला. तसेच अमेरिका त्याला योग्य प्रतिसाद देईल, असा इशाराही दिला. यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त कर लावल्याची घोषणा केली.

डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की, १ नोव्हेंबर २०२५ पासून (किंवा त्याआधी, चीन काय निर्णय घेतो हे पाहून) अमेरिका चीनच्या सर्व आयातीवर १०० टक्के टॅरिफ लादत आहे. सध्या लागू असलेल्या टॅरिफ व्यतिरिक्त हे नवे शुल्क असेल. तसेच १ नोव्हेंबर पासून आम्ही अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या क्रिटिकल सॉफ्टवेअरवरही नियंत्रण आणू.

चीन त्यांच्या अनेक उत्पादनांवर निर्यात निर्बंध लादण्याचा विचार करत आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत असमतोल निर्माण होण्याचा धोका उद्भवतो, असा दावा ट्रम्प यांनी केला असून, या वृत्ताला प्रत्युत्तर देण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अतिरिक्त टॅरिफ लादल्याचे सांगितले जात आहे.

ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त करत सांगितले की, चीनने व्यापाराबाबत कमालीची आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी जगातील देशांना एक पत्र पाठविल्याचे कळले. ज्यामध्ये त्यांनी म्हटले की, १ नोव्हेंबर २०२५ पासून ते त्यांच्या उत्पादनांवर आणि त्यांच्या देशात तयार होणाऱ्या इतर देशांच्या उत्पादनांवर निर्यात नियंत्रणे लादणार आहेत.

याचा परिणाम निश्चितच अनेक देशांवर होईल. याची तयारी त्यांनी काही वर्षांपूर्वीच केल्याचे दिसते. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीकोनातून ही धक्कादायक गोष्ट असून इतर राष्ट्रांचा हा नैतिक अपमान आहे. तसेच ट्रम्प यांनी आणखी एक पोस्ट लिहून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबरची नियोजित भेट रद्द करण्याचेही संकेत दिले आहेत.

दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या APEC शिखर परिषदेत मी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार होतो. पण आता असे करण्याचे कोणतेही कारण दिसत नाही, अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात सुरू झालेल्या व्यापार युद्धानंतर अमेरिकेनने उचललेले हे सर्वांत कठोर संरक्षणवादी पाऊस असल्याचे बोलले जात आहे.

अमेरिकेने चीनवर अतिरिक्त १०० टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय अंमलात आणला, तर त्याचा परिणाम इलेक्ट्रॉनिक्सपासून ते इलेक्ट्रिक वाहनांपर्यंतच्या क्षेत्रांवर होऊ शकतो. यावर आधीच टॅरिफ लादले गेले आहे. अमेरिकेच्या अतिरिक्त १०० टक्के ट्रम्प टॅरिफवर चीनकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नसल्याचे म्हटले जात आहे.