भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 13:44 IST2025-09-13T13:38:30+5:302025-09-13T13:44:33+5:30
भारताच्या शेजारी देशांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून जनक्षोभ भडकला आणि सत्तांतरे झाली. या आर्थिक विषमता आणि भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्द्यावरून नागरिकांच्या संयमाचा कडेलोट झाला आणि राजकीय नेत्यांना देश सोडून पळावे लागले.

उसळलेल्या जनआंदोलनानंतर नेपाळही राजकीय अस्थिरता निर्माण झालेल्या भारताच्या शेजारी देशांमध्ये सामील झाला. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून लोकांचा संयम संपला आणि देशात सत्तांतर झाले. सत्ताधारी नेत्यांना देश सोडून पळून जावे लागले.
अफगाणिस्तान: ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानने देशातील प्रमुख शहरांवर कब्जा करत काबूलवरही निशाण रोवले आणि पुन्हा सत्ता ताब्यात घेतली.
बांगलादेश: गेल्या वर्षी बांगलादेशात सरकारी नोकऱ्यांमध्ये असलेल्या वादग्रस्त आरक्षण व्यवस्थेच्या विरोधात आंदोलन झाले. आंदोलनाला हिंसक वळण लागले. तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानी आंदोलकांनी हल्ला केला. त्यामुळे शेख हसीना यांनी बांगलादेश सोडून भारतात जाणे पसंत केले.
म्यानमार : २०२१ मध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली. लष्कराने तेथील लोकशाही सरकार उलथवून लावले. त्यानंतर त्या देशात यादवी सुरू असून, लष्कर आणि बंडखोर गटांमध्ये संघर्ष शिगेला पोहोचला आहे.
श्रीलंका : २०२१च्या अखेरीस सुरुवात झाली. चुकीच्या धोरणांमुळे आर्थिक स्थिती ढासळत गेली. नागरिक रस्त्यावर उतरले. राजपक्षे बंधूंना देश सोडून पळून जावे लागले.
पाकिस्तान : २०२२ पासून राजकीय अस्थिरता सुरू झाली. लष्कराच्या सूचनेवरून इम्रान खान यांच्या सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मंजूर करून त्यांना सत्तेवरून हटवण्यात आले. सध्या शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील मुस्लीम लीग (नवाज), बिलावल भुट्टोंची पीपल्स पार्टी आणि अन्य लहान-मोठ्या पक्षांच्या मदतीने राजकीय स्थिरता आणण्याचा लष्कराचा प्रयत्न सुरू आहे.