एआय: महासत्ता की महासंकट?, गरीब-श्रीमंतांमधील...; 'संयुक्त राष्ट्र संघा'ने या तंत्रज्ञानाबद्दल दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:50 IST2025-12-05T13:40:17+5:302025-12-05T13:50:24+5:30

एआयमध्ये प्रचंड क्षमता आहे. योग्य धोरणे, पारदर्शक प्रणाली लागू केल्यास एआय शेतीत उत्तम सल्ला देऊ शकते. पण, जर त्याची उपलब्धता केवळ काही देश आणि काही वर्गांपर्यंत मर्यादित राहिली, तर भविष्यातील जग आजपेक्षाही अधिक असमान होईल.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) ची झपाट्याने होणारी प्रगती एका बाजूला संधी घेऊन येत असली तरी, दुसऱ्या बाजूला जगात ‘महान असमानता’ निर्माण करण्याची गंभीर शक्यता आहे, असा स्पष्ट इशारा संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) च्या एका नवीन अहवालाने दिला आहे.

आधी डिजिटल दरी मिटवून एआयची पोहोच सर्वांपर्यंत करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या वेगापेक्षा मानवतेला आणि समानतेला प्राधान्य देण्याची हीच वेळ आहे, असा सल्लाही यूएनडीपीने दिला आहे. श्रीमंत देशांमध्ये डेटा सेंटर्सच्या वाढत्या ऊर्जेच्या गरजांमुळे कार्बन उत्सर्जन वाढण्याचा धोकाही व्यक्त केला आहे.

एआयमध्ये प्रचंड क्षमता आहे. योग्य धोरणे, पारदर्शक प्रणाली लागू केल्यास एआय शेतीत उत्तम सल्ला देऊ शकते. वैद्यकीय एक्स-रेचे त्वरित विश्लेषण करू शकते. हवामान आणि आपत्ती यांचे अचूक भाकीत करून जीवन अधिक सुरक्षित करू शकते.

अहवालानुसार, जर एआयवर वेळीच लक्ष केंद्रित केले नाही, तर औद्योगिक क्रांतीप्रमाणेच काही देश एआयमुळे खूप पुढे जातील, तर बाकीचे देश कायम मागे राहतील.

अहवालाचे मुख्य लेखक मायकल मुथ कृष्णा यांच्या मते, एआय आता वीज किंवा रस्त्यांप्रमाणे जीवनाचा एक मूलभूत भाग बनत आहे. परंतु, जर त्याची उपलब्धता केवळ काही देश आणि काही वर्गांपर्यंत मर्यादित राहिली, तर भविष्यातील जग आजपेक्षाही अधिक असमान होईल.

डिजिटल भविष्यात प्रत्येक समुदायाला समान वाटा मिळावा यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अनेक समुदाय आजही वीज, इंटरनेट आणि डिजिटल कौशल्ये यासारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत.

युद्धामुळे विस्थापित झालेले लोक, वृद्ध आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी एआय अजूनही एक दूरची गोष्ट आहे. सर्वात मोठा धोका हा आहे की, हे लोक एआयसाठी उपलब्ध असलेल्या ‘डेटामधून अदृश्य’ होतील आणि कोणतीही ॲल्गोरिदम त्यांच्या गरजा ओळखणार नाही.