पंतप्रधान ओलींच्या दाव्यानंतर आता नेपाळमध्ये ४० एकरात बनणार अयोध्यापुरी धाम
By ravalnath.patil | Updated: October 1, 2020 15:51 IST2020-10-01T14:44:15+5:302020-10-01T15:51:05+5:30

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या वादग्रस्त दाव्यानंतर नेपाळने आता अयोध्या बनविण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळमधील चितवन जिल्ह्यातील नगरपालिका 40 एकर जागेवर अयोध्यापुरी धाम बांधणार आहे. काठमांडू पोस्टच्या माहितीनुसार, चितवन जिल्ह्यातील माडी नगरपालिकेने अयोध्यापुरीधाम बांधण्यासाठी 40 एकर जागा देण्याचे ठरविले आहे.

याआधी नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी दावा केला होता की, भगवान रामाचा जन्म चितवन येथे झाला होता आणि येथेच खरी अयोध्या आहे, भारतात नाही. त्यामुळे ओली यांच्या या दाव्यामुळे वाद निर्माण झाला होता.

नेपाळ आणि भारत यांच्यात सीमा वादावर आधीच तणाव आहे, अशा परिस्थितीत नेपाळच्या या निर्णयानंतर हा तणाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, माडीचे नगराध्यक्ष ठाकुर प्रसाद धाकल यांनी नेपाळ नॅशनल न्यूज एजन्सीला सांगितले की, 29 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत अयोध्यापुरी धामबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

वादग्रस्त दाव्यानंतर पंतप्रधान ओली यांनी माडी नगरपालिकेत बैठक घेतली आणि अधिक पुरावे गोळा करण्यासाठी पुरातत्व उत्खनन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, ओली यांनी माडी नगरपालिकेला सर्व सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे.

माडीचे नगराध्यक्ष ठाकुर प्रसाद धाकल यांनी सांगितले की, आम्ही अयोध्यापुरी धामसाठी सध्या अयोध्यापुरी पार्कची 40 एकर जमीन दिली आहे. याशिवाय आमच्याजवळ अजून काही अतिरिक्त जमीन आहे. यासाठी आम्हाला काही तांत्रिक अडचणी आल्या तर ही अतिरिक्त जमीन वापरू शकतो, असे नगराध्यक्ष ठाकुर प्रसाद धाकल म्हणाले.

नगराध्यक्ष ठाकुर प्रसाद धाकल यांच्या म्हणण्यानुसार, अयोध्यापुरी धामचा मास्टर प्लॅन तयार झाला असून लवकरच याबाबतचा सखोल अहवाल तयार केला जाईल. दरम्यान, ओली यांच्या राम जन्माच्या दाव्यानंतर नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाला याबाबत स्पष्टीकरण जारी करावे लागले होते.

ओली यांच्या वक्तव्याचा हेतू कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा किंवा भारतातील अयोध्येचे महत्त्व कमी करण्यासाठी नाही. ओली फक्त नेपाळच्या सांस्कृतिक वारशाबद्दल अधिक माहिती गोळा करण्याविषयी बोलत होते, असे नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले होते.

दरम्यान, या वादग्रस्त दाव्यानंतरही पंतप्रधान ओली यांनी ठोरी आणि माडी येथील स्थानिक प्रतिनिधींना काठमांडूला बोलावून भगवान श्री राम यांच्या जन्मस्थळावर भव्य मंदिर बांधण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्याचे निर्देश दिले होते.

ठोरीजवळील माडी नगरपालिकेचे नाव बदलून अयोध्यापुरी करण्याचेही पंतप्रधान ओली यांनी सांगितले. तसेच भोवतालची जागा ताब्यात घेऊन अयोध्येप्रमाणे विकसित करण्यास आणि रामाच्या जन्मस्थळावर भव्य मंदिर, राम-सीता व लक्ष्मण यांच्या भव्य मूर्ती तयार करण्यास सांगितले.

या दसर्यात राम नवमीच्या पार्श्वभूवीवर राम मंदिर बांधकामाचे भूमिपूजन करण्यास ओली यांनी सांगतिले आहे. याशिवाय, अयोध्यापुरी तसेच रामायणाशी संबंधित परिसरही विकसित केला जाईल. त्यांनी माडीजवळ वाल्मिकी आश्रम, सीतेच्या वनवासात जंगल, लव-कुशचे जन्मस्थान इत्यादी क्षेत्रे विकसित करण्यास सांगितले आहे.

















