२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 15:29 IST2025-12-26T15:23:16+5:302025-12-26T15:29:56+5:30

चीन, म्यानमार आणि थायलंडच्या एजेन्सीने सायबर फ्रॉडविरोधात संयुक्त कारवाई केली आहे. म्यानमारच्या म्यावदी परिसरात जुगार आणि ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांचा अड्डा होता. याविरोधात ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. याठिकाणी ४९४ इमारती उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. तर याताई न्यू सिटीमधील फसवणूक करणारा परिसर पूर्णपणे साफ करण्यात आला.

म्यानमारचा हा परिसर जुगारी आणि ऑनलाइन फ्रॉडचा अड्डा बनला होता. त्याठिकाणाहून चीन, म्यानमार, थायलंडचे गुन्हेगार लोकांची फसवणूक करायचे. त्याबाबत या तिन्ही देशांना अनेक महिन्यांपासून तक्रारी मिळत होत्या. त्यानंतर या तिन्ही देशांनी ही कारवाई केली आहे.

या ऑपरेशनमधून ९५२ संशयित चिनी नागरिकांचं प्रत्यार्पण करून त्यांना चीनला परत पाठवण्यात आले आहे. चीनच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाकडून अधिकृतपणे ही आकडेवारी देण्यात आली. या ऑपरेशनसाठी चीनच्या पब्लिक सिक्युरिटी विभागाने एक टास्क फोर्स पाठवला होता.

या टास्क फोर्सने म्यानमार आणि थायलंड यांनी म्यावाडी येथील कारवाईत कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांसोबत सहभाग घेतला. जुगार आणि फसवणुकीवर कारवाई करण्यासाठी तिन्ही देशांनी समन्वय साधत ही संयुक्त कारवाई केली.

याठिकाणी जुगाराचा अड्डा होता, टेलिकॉम फसवणूक क्षेत्रातील गुन्हेगार गेल्या कित्येक काळापासून चिनी नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीचा शिकार बनवत होते. त्यातून त्यांचे गंभीर आर्थिक नुकसान व्हायचे असं चीनने सांगितले.

यावर्षीच्या सुरुवातीला चीन, म्यानमार आणि थायलंडने टेलिकॉम आणि ऑनलाइन फसवणुकीचा सामना करण्यासाठी मंत्रिस्तरीय समन्वय समिती बनवली होती. ज्यातून ही संयुक्त कारवाई करण्यात आली. चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सनुसार ऑक्टोबरपासून म्यानमार अधिकाऱ्यांनी चीन आणि थायलंडसोबत करार करून या संयुक्त कारवाईला सुरुवात केली होती असं सांगितले.

या संयुक्त कारवाईत संशयितांना ताब्यात घेण्यात आले त्याशिवाय जुगार आणि फसवणुकीचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. १५ डिसेंबर रोजी तिन्ही देशांच्या पोलिस दलांनी केके पार्क, यताई न्यू सिटी आणि म्यावाडीतील इतर प्रमुख जुगार आणि फसवणूक स्थळांवर पहिल्यांदा संयुक्त पाहणी केली.

१६ ते १९ डिसेंबर दरम्यान झालेल्या या कारवाईत चीनच्या जिलिन आणि हेनान प्रांतातील पोलिस युनिट्सना अटक केलेल्या संशयितांना चीनला परत पाठवण्याचे निर्देश देण्यात आले. तिन्ही देशांच्या संयुक्त प्रयत्नांद्वारे या वर्षी म्यावाडीमध्ये ऑनलाइन जुगार आणि टेलिकॉम फसवणुकीत सहभागी असलेल्या ७,६०० हून अधिक चिनी नागरिकांना परत पाठवण्यात आले आहे.

या कारवाईत केके पार्कमधील ४९४ इमारती पाडण्यात आल्या आणि यताई न्यू सिटीमधील फसवणुकीचा अड्डा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आला. टेलिकॉम आणि ऑनलाइन फसवणूक आंतरराष्ट्रीय समुदायासमोर एक आव्हान आहे असं एका वरिष्ठ चिनी अधिकाऱ्याने सांगितले.