सिंह-वाघापेक्षाही जास्त धोकादायक असतात पाणघोडे, दरवर्षी घेतात शेकडो लोकांचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 05:16 PM2021-08-03T17:16:46+5:302021-08-03T17:27:56+5:30

African hippos: आफ्रीकेत दरवर्षी पाणघोड्याच्या हल्ल्यात 500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो तर अनेकजण आयुष्यभरासाठी अपंग होतात.

केपटाउन: हिप्पो (Hippo) म्हणजेच पाणघोडा शाकाहारी आणि शांत राहणारा प्राणी आहे. पण, रागात आल्यावर तो सिंह, बाघ आणि अस्वलापेक्षाही रौद्र रुप धारण करू शकतो. दरवर्षी आफ्रिकेत पाणघोड्याच्या हल्ल्यात अनेकांचा जीव जातो तर काहीजण आयुष्यभरासाठी अपंग होतात. पाणघोडा माणसाच्या हाडांचा चुरा करण्यासोबतच शरीरही फाडू शतो.

नर पाणघोड्याचे वजन जवळपास 2.5 टन किंवा त्यापेक्षाही जास्त होऊ शकते. त्याला आपल्या परिसराचे रक्षण करणे चांगल्याप्रकारे माहित असते. एखादी मगर पाणघोड्याच्या परिसरात गेल्यावर तिची जिवंत येण्याची शक्यता फार कमी असते. 'द सन'च्या एका रिपोर्टनुसार, आफ्रिकेत पाणघोड्याच्या हल्ल्यात दरवर्षी 500 लोकांचा मृत्यू होतो. हा आकडा सिंह, वाघ किंवा इतर प्राण्यांच्या हल्ल्यात मरणाऱ्यांपेक्षा खूप जास्त आहे.

केन्यातील Lake Naivasha मध्ये जवळपास 2,000 पाणघोडे राहतात. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी झालेल्या एका घटनेला फोटोग्राफर फ्रेडरिक जेनोविसने आपल्या कॅमेरात कैद केले होते. मॅथ्यू वांजिउकु नावाच्या व्यक्तीवर एका प्रचंड मोठ्या पाणघोड्याने हल्ला केला होता आणि जळपास दहा मिनीटे आपल्या शक्तीशाली जबड्याने चावत होता.

या घटनेबाबत फोटोग्राफर फ्रेडरिक जेनोविस सांगतात की, ‘पाणघोड्याने मॅथ्युला आपल्या जबड्यात पकडले होते आणि हळुहळू त्याच्या शरीराला चावत होता. ते खूप भयंकर दृष्य होतं. मॅथ्युचे हात-पाय आणि मानेचा काही भाग त्याने चावून काढला होता. काही वेळानंतर आसपासच्या लोकांनी त्या पाणघोड्याला पळवले आणि मॅथ्युची त्याच्या तावडीतून सुटका केली. (फोटो सोर्स: द सन)

केन्यातील स्थानि मच्छीमार एनॉक रोमानोलाही एक पाणघोड्याने आयुष्यभर न विसणारे दुःख दिेले आहे. एके दिवशी एनॉक आपल्या मित्रासोबत नैवाशा तलावाकिनारी मासे पकडत होता. तेव्हा अचानक एका पाणघोड्याने त्या दोघांवर हल्ला चढवला. त्या हल्ल्यात जखमी झालेल्या एनॉकचे दोन्ही पाय डॉक्टरांना कापावे लागले होते.

झिम्बाब्वेचे रहिवासी असलेले पॉल टेंपलरवर 1996 मध्ये एका पाणघोड्याने हल्ला केला होता. पाणघोड्याने 39 वेळ टेंपलर यांच्या शरीराचा चावा घेतला होता. त्या हल्ल्यात टेंपलर यांना आपला एक हात गमवावा लागला. (फोटो सोर्स: द सन)

आफ्रीकेतील रहिवासी असलेले जेकब कांदजिमी यांच्यावरही एका पाणघोड्याने हल्ला केला होता. जेकब ओकावांगो नदीत पोहण्यासाठी गेले असता, अचानक त्यांच्यावर एका पाणघोड्याने हल्ला केला. सुदैवाने त्यांचा जीव वाचला होता.(फोटो सोर्स: द सन)

जाणकार सांगतात की, इतके प्रचंड वजन असूनही पाणघोडे अतिशय चपळ असतात आणि ते माणसापेक्षा जास्त वेगाने पळू शकतात. पाणघोडे 30 मैल प्रति तासांच्या वेगाने धावू शकतात. वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर उसैन बोल्टशी तुलना केल्यावर, पाणघोडे बोल्टपेक्षा 3 मैल प्रति तास जास्त वेगाने धावतात.