९ तास काम, कॅबमध्ये अभ्यास अन् ४ वेळा अपयश...; २३ लाखांची नोकरी सोडून अखेर काजल IAS बनलीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 12:48 IST2026-02-26T12:38:22+5:302026-02-26T12:48:54+5:30

'लहरों से डर कर नौका पार नही होती, कोशिश करने वालों की हार नही होती...' हिंदीतील ही प्रसिद्ध कविता मेरठची कन्या काजल जावलाच्या कहाणीवर परफेक्ट जुळून येते. UPSC परीक्षेत अनेकदा प्रयत्न केले, ४ वेळा पदरी अपयश आले तरीही आपले ध्येर्य काजलने सोडले नाही.

जॉब करता करता स्पर्धा परीक्षेची तयारी करणे सोपे नव्हते. परंतु काजलने दोन्हीमध्ये संतुलन राखले. ऑफिसमध्ये ९ तास काम करून रस्त्याने घरी येता जाता कॅबमध्येही काजलने अभ्यास केला. ४ वेळा अपेक्षित निकाल न आल्याने हिंमत न हरता तिने पाचव्यांदा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न यशस्वी ठरला आणि २३ लाखांची नोकरी सोडून काजल IAS बनली.

एका मुलाखतीत काजल सांगते की, मी मूळची उत्तर प्रदेशातील मेरठ येथे राहणारी आहे. माझे संपूर्ण शिक्षण तिथेच झाले. लहानपणापासून मला डॉक्टर बनण्याची इच्छा होती परंतु त्यावेळी लोक स्पर्धा परीक्षेबाबत बोलत होते. मला त्याबद्दल फारशी आयडिया नव्हती. २०१० साली इंजिनिअरींगच्या शिक्षणासाठी मी मथुरेला गेली. तिथे बी.टेकची पदवी घेतली.

कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग केल्यानंतर एका कंपनीत चांगल्या सॅलरीची नोकरी मिळाली. परंतु वडिलांची इच्छा होती, मुलीने स्पर्धा परीक्षेची तयारी करावी आणि देशाची सेवा करावी...वडिलांचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी काजलने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली होती.

नोकरीला असताना काजलचे लग्न झाले परंतु तिने यूपीएससीची तयारी करणे सोडले नाही. लग्नानंतर तिच्या या स्वप्नांना पतीचे पाठबळ मिळाले. ९ तास काम करूनही तिने UPSC तयारी सुरूच ठेवली. घरातून ऑफिसपर्यंत जाण्यासाठी जवळपास २ तास लागायचे. त्यामुळे या वेळेचा सदुपयोग करत कॅबमध्येच तिने अभ्यास सुरू केला.

सुट्टीच्या दिवशी अभ्यासासाठी जास्त वेळ मिळायचा. काजलच्या या तयारीत पती आणि वडिलांकडून तिला कायम पाठिंबा मिळायचा. मी जेव्हा अभ्यास करायचे तेव्हा माझे पती घरातील सर्व कामे करायचे. मी जेव्हा ऑफिसमधून घरी यायचे तेव्हा ते त्यांच्या ऑफिसमधून थोडे आधी येऊन भाजी तयार करायचे. मी फक्त घरी जाऊन चपात्या बनवल्या आणि आम्ही दोघेही आरामात खायचो असं काजल म्हणते.

काजलने २०१२ साली यूपीएससीची पहिला प्रयत्न केला होता. त्यावेळी तिचे अनेक वर्ग मित्र ही तयारी करत होते. त्यामुळे तिनेही सहज परीक्षा दिली.त्यानंतर काजलला यूपीएससीबाबत समजू लागले. त्यात तिने अधिक रस घेतला. २०१४ च्या प्रयत्नातही तिला अपयश आले.

२०१६ साली लग्नानंतर पुन्हा एकदा काजलने यूपीएससी परीक्षा दिली परंतु यावेळीही ती अपयशी ठरली. त्यानंतर काजलने अधिक एकाग्रतेने अभ्यास केला. २०१७ साली चौथ्यांदा काजलला अपयश आले. मात्र चार वेळा अपयश येऊनही तिने प्रयत्न करणे सोडले नाही.

२०१८ साली पाचव्यांदा काजलने यूपीएससी परीक्षा दिली. मात्र या परीक्षेत तिने घवघवीत यश मिळवत थेट २८ वा रँक मिळवला. या तयारीच्या काळात नोकरीतही तिने चांगले यश मिळवले होते. तिचा पगार जवळपास २३ लाखांपर्यंत पोहचला होता.

UPSC परीक्षेत यश मिळाल्यानंतर काजल IAS बनली आणि तिने हाय सॅलरी पॅकेजचा जॉब सोडून दिला. काजल मध्य प्रदेश कॅडरमधील अधिकारी आहे. काजलचे हे यश लाखो युवकांसाठी प्रेरणादायी आहे जे आयुष्यात कुठलेही ध्येर्य गाठण्यासाठी करत असलेले प्रयत्न कधीही सोडत नाहीत.

















